शिंदे गट फुटणार?, बंडखोर आमदाराचे फोनवर धक्कादायक खुलासे; Audio Clip व्हायरल

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 08, 2022 | 07:07 IST

काही दिवसांपूर्वी शिवसेनेतल्या आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. आता शिंदे गटातले बंडखोर आमदाराची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे 
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली.
  • शिंदे गटातले बंडखोर आमदाराची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
  • ऑडिओ क्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल.

मुंबई: सध्या राज्यातल्या राजकारणात रोज नवनव्या घडामोडी घडताना पाहत आहोत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतल्या आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. बऱ्याच घडामोडीनंतर बंड केलेल्या आमदारांनी म्हणजे एकनाथ शिंदे गटानं भाजपासोबत हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. पण आता शिंदे गटातले बंडखोर आमदाराची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये शिंदे गटाचे बंडखोर आमदार चिमणराव पाटील आणि एका शिवसैनिकाच्या फोन कॉलवरील संवादाची ऑडिओ क्लिप आहे. ही क्लिप सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. मी शिवसेना सोडावी म्हणून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी कटकारस्थानं केली असल्याचा धक्कादायक खुलासा चिमणराव पाटील यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. त्यामुळे आता या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल. 

काय म्हणाले चिमणराव पाटील 

मी शिवसेना सोडावी यासाठी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील आणि स्थानिक शिवसैनिकांनी कटकारस्थानं रचली. गुलाबराव पाटील यांनी आपल्याला खूप त्रास दिला असल्याचं चिमणराव पाटील यांनी फोन कॉलवरील संवादाच्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. 2014 साली झालेल्या निवडणुकीत माझा पराभव करण्यामागे गुलाबराव पाटील यांचाच हात होता, असा आरोप ही त्यांनी केला आहे.

अधिक वाचा-  फडणवीसांनी शिंदेंच्या हाताला धरलं अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं, समजून घ्या राजकारणातील ही खेळी!

मी माझ्या व्यथा मांडण्यासाठी भिकाऱ्यासारखा पक्षश्रेष्ठींच्या मागे फिरत असायचो. माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचं नाही आहे. पण मला त्रास होत होता म्हणून बंडखोरी केली. येथे न्याय मिळत नव्हता, आता जे काही व्हायचं ते होईल, असे धक्कादायक खुलासे चिमणराव पाटील यांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलेत. 

शिवसेनेच्या स्थानिक लोकांनी ही मला खूप त्रास दिला.  माझ्या मतदारसंघात येऊन कार्यक्रम करत होते.  माझ्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. इतका त्रास दिला कमी त्यांच्यासोबत राहू नये अशी परिस्थिती यांनी निर्माण केली होती.ज्या शिवसेनेतल्या लोकांनी मला पाडलं त्यांना मंत्रिपद दिलं गेल्याची खंत एरंडोल मतदारसंघातले आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्याबद्दल व्यक्त केली आहे.

पुढे चिमणराव पाटील यांनी आरोप केला आहे की, गुलाबराव पाटील यांनी शिवसेना वाढवून दिली नाही. जळगाव जिल्ह्यात शिवसेना संपवणारा माणूस म्हणजे गुलाबराव पाटील. मी स्वत: उद्धव साहेबांना भेटून सांगितलं की मला खूप त्रास होतोय. तरी काही नाही. साहेब मला 29 वर्षे झाली. इतक्या वर्षात माझी एकतरी चूक दाखवा. आपल्यापेक्षा कार्यकर्तेच जास्त वैतागले होते. माझ्याविरोधात पोलिसांना सुद्धा फोन करायचा.

(या ऑडीओची टाइम्स नाऊ मराठी पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी