कोकणात वरूणराजाची दमदार हजेरी, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या; रेल्वे रूळ पाण्याखाली

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 05, 2022 | 11:51 IST

सध्या कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे.

Rain Updates
कोकणात ऑरेंज अलर्ट  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्यात कोकणासह अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे.
  • कोकणाला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
  • रत्नागिरीत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई: राज्यात कोकणासह अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. 

कोकणाला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे होणारी संभाव्य परिस्थिती हाताळण्याकरिता रत्नागिरी आणि रायगडमध्ये NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. चिपळूण शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. खेड आणि लांजामध्ये प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

कोल्हापुरातील पावसाची परिस्थिती 

पंचगंगा नदीच्या पात्रात झपाट्यानं वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीची पातळी 24 फुटांपर्यंत आली आहे. काल संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे.  भोगावती आणि कासारी नदी दुथडी भरून वाहत आहे. बर्की बंधारा पाण्याखाली गेला आहे.  

अधिक वाचा- माँ कालीच्या हातात सिगरेट बघून संतापले नेटकरी, सिनेमाचं पोस्टरवरून कॅनाडात गदारोळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत की, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान कोल्हापुरात नागरिकांना पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी. पूरग्रस्त भागातून नागरिकांचे स्थलांतर करावे. 


 
रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती

राजापूरला पुरानं वेढलं आहे. अनेक नद्या भरल्यानं वाहू लागल्या आहेत. पुलांवरून पाणी गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. लांजा तालुक्यातल्या लोकवस्तीतही पाणी शिरलं आहे. खेडमधील जगबुडी, संगमेश्वर- लांजा तालुक्यातील काजळी नदी आणि चिपळूणमधील वशिष्ठ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

अधिक वाचा- ...म्हणून Aaditya Thackeray वगळून शिवसेनेच्या 14 आमदारांना व्हिप उल्लंघनाची नोटीस

वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला आहे. तर, वेंगुर्लामधील मानसीश्वर मंदिर पाण्याखाली गेल्यानं नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
 
रायगडमध्ये पावसाची स्थिती 

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगडमधील सावित्री नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे. काल  दुपारपासून महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी