वसई : महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील वसईत दुर्दैवी घटना घडली. मोबाईलकडे बघताना तोल गेल्यामुळे साडेतीन वर्षांची मुलगी इमारतीच्या सातव्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना वसईच्या अग्रवाल टाऊनशिपमधील एका इमारतीत घडली. दुर्दैवी घटनेत साडेतीन वर्षांच्या श्रेया महाजन हिचा मृत्यू झाला.
महाजन कुटुंब अग्रवाल टाऊनशिपमधील रिजन्सी सोसायटी येथे सातव्या मजल्यावर राहते. घटना घडली त्यावेळी श्रेयाची आई मोठ्या मुलीला सोडण्यासाठी शाळेत गेली होती. श्रेया घरात झोपली होती. जाग आली त्यावेळी आई आणि ताई घरात नसल्याचे पाहून श्रेयाने आईचा घरात राहिलेला मोबाईल हातात घेतला आणि खेळायला सुरुवात केली. मोबाईल खेळण्याच्या नादात श्रेया घराच्या बाल्कनीत गेली. खेळत असताना श्रेयाच्या हातातून मोबाईल निसटला आणि बाल्कनीतून खाली पडला. मोबाईल कुठे गेला हे बघण्यासाठी श्रेया वाकली आणि तिचा तोल गेला. वाकून मोबाईल बघताना तोल गेल्यामुळे श्रेया थेट सातव्या मजल्यावरून खाली पडली. तिचा मृत्यू झाला. माणिकपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. नियमानुसार घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रेयाचे वडील कामाच्या निमित्ताने सिंगापूरमध्ये असतात. घरी आई आणि दोन मुली असे तीन जणच असतात. श्रेयाची आई सात वर्षांच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. श्रेया घरात एकटीच झोपली होती. पण आई घरी परत येण्याआधीच श्रेयाला जाग आली आणि दुर्दैवी घटना घडली.
मोबाईल हातातून निसटल्यावर श्रेया बाल्कनीतून वाकली. तोल गेल्यामुळे श्रेया सातव्या मजल्यावरून खाली पडली. तिचे कपडे सोसायटीतील एका एसीच्या यंत्रणेच्या हुकमध्ये अडकले. पण थोड्याच वेळात ते कपडे फाटले यामुळे श्रेयाचे मणक्याचे हाड मोडले आणि ती खाली पडली. मणक्याचे हाड मोडले आणि सातव्या मजल्यावरून खाली पडली यामुळे श्रेयाचा मृत्यू झाला.
आई घरी परण्याआधीच श्रेयाचा मृत्यू झाला होता. श्रेयाची आई आली त्यावेळी सोसायटीच्या वॉचमनने घटनेची माहिती तिला दिली. श्रेयाचे पार्थिव बघून आईला अश्रू अनावर झाले.