गेल्या १५ दिवसातील सर्वात मोठी बातमी... राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण

गावगाडा
Updated Nov 09, 2019 | 22:04 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला निमंत्रण दिलं आहे.

maharashtra governor bhagatsingh koshyari invites largest party bjp to form government
राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला दिलं सत्तास्थापनेसाठी निमंत्रण
  • ११ नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत
  • सत्ता स्थापनेचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या चर्चेनंतर होणार

मुंबई: राज्यात गेले काही दिवस प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी सुरु होत्या. त्यानंतर काल (शुक्रवार) देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता गेल्या १५ दिवसातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. यासोबतच ११ नोव्हेंबरपर्यंत बहुमत देखील सिद्ध करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलेलं असलं तरीही भाजप हे आमंत्रण स्वीकारणार की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण बहुमताचा आकडा गाठण्याइतपत संख्याबळ सध्या तरी भाजपजवळ नाही. अशावेळी भाजप काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलेलं असलं तरीही हे आमंत्रण स्वीकारायचं की नाही याबाबतचा निर्णय हा भाजप उद्या (रविवार) घेणार आहे. यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देखील होणार आहे. याच बैठकीनंतर नेमका निर्णय घेतला जाईल. अशी माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाला बहुमत मिळालं नाही. मात्र, १०५ जागांसह भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे आता राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष या नियमानुसार भाजपला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. अशावेळी भाजप सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला राजी करणार की, दुसरे कोणते पर्याय वापरणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ही मागणी शिवसेनेने कायम ठेवली आहे. त्यामुळे आता भाजप एक पाऊल मागे जाऊन ही मागणी मान्य करुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करणार का? अशीच सध्या राजकीय स्तरावर चर्चा आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल थेट पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले. त्यामुळे या दोन्ही पक्षातील संबंध टोकाला पोहचले आहेत. पण असं असताना देखील दोन्ही नेत्यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की, चर्चेची दारं खुली आहेत. त्यामुळेच आता भाजप काय निर्णय घेतं यावर संपूर्ण सत्तास्थापनेचं गणित अवलंबून असणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं अशी विनंती केली होती. जी त्यांनी मान्यही केली होती. त्यानंतर आज (शनिवार) दुपारच्या दरम्यान, फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन साधारण तासभर त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आता संध्याकाळी राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. जर भाजपने राज्यपालांचं आमंत्रण स्वीकारलं तर पुढील तीनच दिवसात त्यांना बहुमत सिद्ध करण्याच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...