मुंबई: Maharashtra Government Expansion of The Cabinet: महाराष्ट्रातल्या राजकारणात नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात राज्यात सत्ताबदल झाला. हा सत्ताबदल होऊन आता एक महिना होत आला आहे. मात्र अजूनपर्यंत राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. 30 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेतली. शिंदे गट आणि भाजप यांनी राज्यात नवं सरकार स्थापन केलं. मात्र नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा (Expansion of The Cabinet) विस्तार कधी होणार?, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण आता या प्रश्नाचं उत्तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शिंदे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला यात शंका नाही. मात्र याबाबत कोणत्याही स्तरावर वाद नाही. येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करू. मंत्रिपदाच्या निवडीबाबत कोणताही वाद नाही, हे पुन्हा एकदा सांगतो. आता यात विलंब होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
अधिक वाचा- Mass suicide: तीन सख्ख्या बहिणींनी घेतला गळफास, मध्यरात्री असं काय घडलं?
मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळाचा विस्तार एकाच वेळी किंवा दोन टप्प्यात करायचा याबाबत कोणतीही चर्चा झालेला नसल्याचं समजतंय. टाइम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं हा दावा केला आहे.
एखाद्या वेळास मंत्रिमंडळ विस्तार दोन वेगवेगळ्या टप्प्यात झाला तर 19 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 12 भाजपचे तर शिंदे गटातल्या 7 नेत्यांना मंत्री केले जाण्याची शक्यता आहे. केवळ एकाच टप्प्यात विस्तार झाल्यास त्यात भाजपच्या 26 नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटातील 14-15 नेत्यांना संधी मिळू शकते.
शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याचा कार्यक्रम रद्द केला. शिंदे यांचा दौरा अचानक रद्द करण्यामागे मुख्यमंत्री कार्यालयाने कोणतंही कारण दिलेलं नाही. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अटकेदरम्यान शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. राज्यात शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील सत्ता येऊन जवळपास महिना उलटूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
गेल्या महिन्यात नव्या मुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन राज्य सरकारने 30 जुलै रोजी शपथ घेतली आणि सध्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच सदस्य आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड केला. या बंडानंतर महाविकास आघाडी (MVA) सरकार अल्पमतात आली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपआपल्या पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून शिंदे यांनी चार वेळा दिल्लीला भेट दिली आहे.