सोलापूर: भाजप नेत्यासंदर्भातली एक बातमी समोर येत आहे. राज्यातील सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष केलेला प्रताप समोर आला आहे. सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची एका महिलेसोबतची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणानंतर श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत एक महिलेविरोधात हनीट्रॅपचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की, ही महिला आपल्याकडे 2 कोटींची मागणी करत असून वारंवार ब्लॅकमेल करत आहे.
देशमुखांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता त्यांचा आणि महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत श्रीकांत देशमुख आणि एक महिला एका रूममध्ये दिसत आहे. दोघांमध्ये वादावादी होतानाही दिसत आहे. रडणारी महिला देशमुख यांच्यावर आरोप करत असून हात दाखवून हातवारेही करत आहे. याच दरम्यान देशमुख तो व्हिडिओ बंद करण्याचा ही प्रयत्न करतात.
देशमुख यांच्या तक्रारीवरून महिलेविरुद्ध अंबोली पोलीस ठाण्यात खंडणी आणि हेतुपुरस्सर अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. राजकीयदृष्ट्या पाहता श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा सोलापुरातील भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जय सिद्धेश्वर आचार्य विजयी झाले होते. आता देशमुख यांच्याबाबतचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यास भाजपची प्रतिमा खराब होऊ शकते.
श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा
भारतीय जनता पार्टी, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्विकारला आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.