Maharashtra Rain: राज्यात पावसाचं थैमान, आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू; 'या' 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट

गावगाडा
Pooja Vichare
Updated Jul 13, 2022 | 10:16 IST

Maharashtra Rain: राज्यात (Maharashtra)पावसानं थैमान घातलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Rain update
महाराष्ट्रात पावसाचं थैमान  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • नाशिक (Nashik) आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
  • नदीच्या काठावरची सर्व घरे आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
  • मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

मुंबई: राज्यात (Maharashtra) पावसानं थैमान घातलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक (Nashik) आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नद्यांना उधाण आलं आहे. नदीच्या काठावरची सर्व घरे आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत, तर नागपुरात पुरात एक कार बुडाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.  पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील 2.3 तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता  वर्तवण्यात आली आहे.

अधिक वाचा- हनीट्रॅपची तक्रार करणाऱ्या BJP नेत्याचा महिलेसोबतचा खोलीतला 'तो' Video Viral

गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यातही पावसानं कहर केला आहे. या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. या जिल्ह्यातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. एकनाथ शिंदे गडचिरोलीतील पूरस्थितीवर लक्ष ठेवून असून, लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

दुसरीकडे अकोल्यातील नद्या ओसंडून वाहत आहे. त्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पालघर, नाशिक, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातल्या या जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला आहे.

दरम्यान प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे आज नाशिक शहरात शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत नाशिक शहरात 24 तासांत 97.4 मिमी पाऊस झाला. मात्र, नंतर काही काळ पाऊस थांबल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. सोमवारी जिल्ह्यातील सप्तशृंगी मंदिराजवळ जोरदार पाऊस झाला.

पालघरमध्ये रेड अलर्ट 

12 जुलै ते 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग मुंबईकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी