राज्यावर पुढील 5 दिवस अस्मानी संकट, कोकणात पावसाचं थैमान; अतिवृष्टीचा इशारा

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 05, 2022 | 08:18 IST

रत्नागिरी जिल्ह्यातली जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Rain Updates
राज्यात सर्वत्र दमदार पावसाचा इशारा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
  • राज्यात मुंबई, रायगड, कोल्हापूरसह पावसानं थैमान घातलं आहे.
  • रायगड जिल्ह्यात सावित्री नदी सुद्धा इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे.

मुंबई: पावसासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. राज्यात मुंबई, रायगड, कोल्हापूरसह पावसानं थैमान घातलं आहे. दिवसभर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातली जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 

तर रायगड जिल्ह्यात सावित्री नदी सुद्धा इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे. जगबुडी आणि काजळी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वशिष्ठीसह अन्य नद्यांच्या पाण्याच्या पातळीत ही वाढ झालेली पाहायला मिळतेय. पुढील पाच दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (NDRF) तुकड्या कोकण आणि विदर्भात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.  कणकवली, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

हवामान खाते कुलाबा, मुंबईकडून आलेल्या सुचनेनुसार 7 जुलैपर्यंत जिह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या  मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती 

रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसानं नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यानंतर खेड नगरपरिषदेनं भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे NDRF चं पथक चिपळुणात दाखल झालं आहे. 

रविवारी रात्रीपासून तळकोकणात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. सावर्डे, कापसाळ रस्ता जलमय झाले आहेत. येथील महामार्ग देखील पाण्याखाली गेलेत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड-चिपळूणपर्यंत चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं आहे. 

अधिक वाचा- मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली; 75 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आज मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा आणि विजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर पुढचे दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी