मुंबई: राज्यात जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. राज्यातल्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. नद्या, धरणांना पूर आले. अजूनही या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती (Flood) निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पावसामुळे अनेकांचे जीवही गेले आहेत. जुलै महिन्यात राज्यात विविध भागात अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. या अतिवृष्टीचा फटका राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना बसला. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील 275 गावातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. या पावसामुळे आतापर्यंत 104 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 68 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यंदाच्या मोसमात सरासरी 499 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात सरासरी 8.3 मिमी पाऊस पडल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
अधिक वाचा- भर गर्दीच्या वेळी मॉलच्या फूड कोर्टमध्ये गोळीबार; 4 लोकांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
राज्यात पावसामुळे झालेलं नुकसान
1 जून 2022 पासून राज्यात आतापर्यंत एकूण 499.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यातल्या 23 हून अधिक जिल्ह्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला. राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशिम, यवतमाळ, धुळे, नागपूर, पालघर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस झाला. राज्यात या मुसळधार पावसामुळे 44 घरांचं नुकसान झालं तर 1368 घरांचं किरकोळ नुकसान झालं.
राज्यभरात 73 ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्यात आली. राज्यातल्या या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या पूरस्थितीतून 11 हजार 836 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
नागपूर, नाशिकमध्ये सर्वाधिक बळी
नागपूरमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यात नागपुरातील 15, वर्ध्यात 4, भंडारामध्ये 2, गोंदियात 6 आणि गडचिरोलीत 5 अशा 32 जणांचा समावेश आहे. त्यानंतर नाशिक विभागात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील 13 , नंदुरबारमध्ये 3, धुळे येथे 2, जळगावात 4 आणि अहमदनगरमध्ये 3 जणांचा समावेश आहे. आपत्ती विभागानं यासंदर्भातली माहिती दिली आहे.