मुंबई: Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं थैमान घातलं आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यानं पूर आले आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला होता. मात्र पावसाचा आजचा वेग थोडा मंदावलेला पाहायला मिळणार आहे. आज रायगड, पालघर आणि पुणे, सातारा, कोल्हापुरात (Raigad, Palghar and Pune, Satara and Kolhapur) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा (Rainfall) जोर कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती कायम आहे. जोरदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट
राज्यात आजही पाऊस असणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. गुरूवारी नाशिक, पालघर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुण्यात धो-धो पाऊस
पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले, धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे अशा धोकादायक ठिकाणी पर्यटनास 17 जुलैपर्यंत बंदी आणली आहे. या परिसरात 17 जुलैपर्यंत कलम 144 लागू असेल. पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईतला पाऊस
मुंबई, कोकण भागात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अधिक वाचा- केसरकर... दुसऱ्याच्या नावाने पावती फाडायची नाय !, अजितदादांचा प्रेमाचा सल्ला
दुसरीकडे मराठवाड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांत पाणी शिरल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.