Maharashtra Rain Updates: राज्यात पावसाचं धुमशान, अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर 'या' जिल्ह्यातल्या शाळा बंद

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 14, 2022 | 12:05 IST

Maharashtra Rain Updates: येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असल्यानं राज्यातल्या अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

School Closed
अनेक ठिकाणी शाळा बंद, जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पुढच्या 48 तासांसाठी राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
  • ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल या महापालिका क्षेत्रात आज हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबई: पुढच्या 48 तासांसाठी राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain)  सुरू आहे. सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे शहर (Pune city) , गडचिरोली (Gadchiroli), या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा (Heavy Rainfall)  इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट (Red Alert)  जारी करण्यात आला आहे.   येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असल्यानं राज्यातल्या अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 

या भागातल्या शाळा राहणार बंद 

ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल या महापालिका क्षेत्रात आज हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानंतर या भागातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने आज 14 जुलै 2022 रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितलं. 

अधिक वाचा- राज्यात जोरदार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट  जारी; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत- जाणून घ्या पावसासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स 

तर 15 जुलैला मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती उपकुलसचिव विनोद माळाळे यांच्याकडून देण्यात आली आहे. 

ठाण्यात दोन दिवस शाळांना सुट्टी 

ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. ठाण्यातल्या काही भागांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळांना पुढील 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शाळा उद्या आणि परवा म्हणजेच 14 आणि 15 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये आणि अतिवृष्टिमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी ठाणे जिल्ह्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही शाळा बंद 

पुणे जिल्ह्याला पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. अतिवृष्टी होण्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या शाळा बंद आहेत. तसंच पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. 

रायगडमध्ये ही शाळांना सुट्टी 

गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा- तुम्हाला माहितेय कल्याणमध्ये दरवर्षी म्हशी उड्डाणपुलावर दावणीला का बांधतात?

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातही शाळा नाही 

पुढील 48 तासात कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.  पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे.  तर साताऱ्यामध्ये कोयना भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर या भागातल्या शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. 

नांदेडमध्ये ही शाळा बंद 

नांदेड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी