Maharashtra Rain:अतिवृष्टीचा इशारा, राज्यातल्या 'या' भागातल्या नागरिकांनी घ्या खबरदारी; अलर्ट जारी

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 07, 2022 | 09:33 IST

Maharashtra Rain Updates: येत्या चार ते पाच दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहणार असल्याचा अंदाज आहे. केंद्रीय हवामान खात्यानं राज्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Rain Updates
Maharashtra Rain Updates 
थोडं पण कामाचं
  • राज्य सरकानं महत्त्वपूर्ण पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे.
  • राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे.

मुंबई: केंद्रीय हवामान खात्यानं राज्याला अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यानंतर राज्य सरकानं महत्त्वपूर्ण पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच कोकण विभागातल्या सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. 

भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकण विभागात सर्वाधिक पाऊस लांजा येथे 823 मिलीमीटर नोंदवण्यात आला आहे. पालघर (शेती) केंद्रावर या सहा दिवसांमध्ये 658 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल मुंबईच्या सांताक्रूझ केंद्रावर पावसाची नोंद झाली आहे.

अधिक वाचा- शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा; आजारपणात पक्ष नेतृत्वाचा साधा फोनही नाही, खासदाराकडून खंत व्यक्त

रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यातल्या काही भागात ही तीव्र ते अति तीव्र पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.  पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या काही तासात पडेल, असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी खबरदारी घ्यावी, अशी सूचना हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 

कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार 

येत्या चार ते पाच दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहणार असल्याचा अंदाज आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर कोकणात राज्य सरकारनं विविध ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 154.89 मिमी पावसाची नोंद झाली. सद्यस्थितीत पूरस्थिती नसली तरी खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहतेय. तर गेल्या 24 तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 155 मिमी पावसाची नोंद झाली. 

विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नाही. मात्र पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत गेल्या 24 तासांत 7 फुटांनी वाढ झाली आहे.

अधिक वाचा- रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री; सीएम शिंदेंचा थेट डॉं. शिंदेंना फोन, म्हणाले उपचारात कसूर नको
 

कुठे-कुठे किती तुकड्या तैनात 

मुंबईत कांजुरमार्ग आणि घाटकोपर येथे दोन एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत.  पालघर येथे एक, रायगड-महाड येथे दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये दोन, कोल्हापूरमध्ये दोन, साताऱ्यात एक, सिंधुदुर्ग येथे एक अशी 13 पथके राज्यभरात तैनात करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. 

अधिक वाचा- एकनाथ शिंदेंना शह देण्याची या ठाणेदारावर जबाबदारी, भावना गवळींच्या जागी राजन विचारे लोकसभेतील चीफ व्हीप

याव्यतिरिक्त नांदेड आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत तीन, पुण्यात एक, नागपुरात एक अशा एकूण पाच एनडीआरएफच्या, तर धुळे येथे दोन, नागपुरात दोन अशा चार एसडीआरएफच्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात करण्यात आल्याचं राज्य सरकारनं सांगितलं.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी