Maratha reservation: मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल

गावगाडा
भरत जाधव
Updated May 05, 2021 | 09:17 IST

मराठा आरक्षण मिळणार की नाही याचं उत्तर आज सर्वांना मिळणार असून आज सर्वोच्च न्यायालय आरक्षणप्रश्नी निकाल जाहीर करणार आहे.

Maratha reservation
मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मराठा आरक्षणाविषयी आज निकाल
  • एसईबीसी कायद्याच्या वैधतेला अॅड. जयश्री पाटील-सदावर्ते यांनी दिलं होतं आव्हान
  • मराठा आरक्षणाचा निकाल सकारात्मक लागेल - अशोक चव्हाण

नवी दिल्ली : मराठा आरक्षण मिळणार की नाही याचं उत्तर आज सर्वांना मिळणार असून आज सर्वोच्च न्यायालय आरक्षणप्रश्नी  निकाल जाहीर करणार आहे. या निकालाकडे राज्याबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. एस. अब्दुल नाझीऱ, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या पीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायासन क्रमांक ५ येथे हा निकाल घोषित करण्यात येणार आहे.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणाऱ्या एसईबीसी कायद्याच्या वैधतेला अॅड. जयश्री पाटील-सदावर्ते यांनी आव्हान दिले होते. देशाचे लक्ष लागलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या खटल्यात राज्य शासन आणि औरंगाबादचे विनोद नारायण पाटील हे प्रतिवादी आहेत. पाचसदस्यीय घटनापीठासमोर याची सुनावणी झाली. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मराठा आरक्षण कायदा पारित केला होता. सर्वोच्च न्यायालयात १०२ वी घटनादुरुस्ती आणि ५० टक्के मर्यादा या दोन्ही प्रमुख मुद्द्यांवर राज्य सरकार व आरक्षण समर्थक खासगी याचिकाकर्त्यांकडून प्रभावी युक्तिवाद झाला.

सामाजिक व आर्थिक मागासवर्ग निश्चितीचा अधिकार राज्य विधिमंडळांना आहे का, या मुद्याबरोबच न्यायालय सहा महत्त्वाच्या मुद्यांचा विचार करून निकाल जाहीर करणार आहे. त्यात आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादाभंगाच्या मुद्याचाही समावेश असेल. अनेक राज्यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा आधीच भेदलेली आहे. परिणामत: मराठा आरक्षण निकालाचा देशव्यापी आरक्षणावर परिणाम होईल. त्यामुळे न्यायालयाचा निकाल दूरगामी परिणाम करणारा असेल, असे मानले जाते.

“मराठा आरक्षणाच्या बाजूनेच हा निकाल लागेल याबाबत आपण पूर्ण आशावादी आहोत. सर्व संविधानिक प्रक्रिया पूर्ण करुनही याबाबतच्या सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात चांगल्या आणि निष्णात वकिलांनी युक्तीवाद केला आहे. मराठा आरक्षण हे कसं योग्य आहे, ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणं हे कसं बरोबर आहे, या सर्व मुद्द्यांमध्ये कुठलीही उणीव राहिलेली नाही, असे सांगत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सकारात्मक निकालाबद्दल आशावाद व्यक्त केला आहे. १९९२ मध्ये इंद्रा सहाणी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. ९ सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी