मुंबई: Outbreak of monkeypox virus In Maharashtra: देशात आता मंकीपॉक्सनं (Monkeypox) चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस मंकीपॉक्सचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) म्हणून घोषित केलं आहे.आता मंकीपॉक्सचे पडसाद हळूहळू महाराष्ट्रातही दिसू लागले आहे. राज्यातही लहान मुलांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळून येत आहे. त्यामुळे पालकांची चांगलीच झोप उडाली आहे.
राज्यातल्या काही लहान मुलांमध्ये हात पाय तोंडाच्या संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. लहान मुलांमध्ये मंकीपॉक्ससारखी लक्षणं आढळून येत असल्यानं पालकांमध्ये चिंता वाढत चालली आहे. धक्कादायक म्हणजे मुंबई, ठाणे शहरात अशी लहान मुलांच्या हात, पाय तोंडाला होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचं प्रमाण मोठ्या प्रमाणाता आढळून आलं आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे शहरातील पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
अधिक वाचा- जवाहिरीनंतर आता 'या' दहशतवाद्याच्या शोधात अमेरिका, कोट्यवधींचं बक्षीस देखील जाहीर
काय आहेत लहान मुलांमध्ये लक्षणं
या आजारात लहान मुलांना हात, पाय आणि तोंडाजवळ पुरळ येऊन मुलांना ताप येतो. यामध्ये मुलांना तोंडामध्ये अल्सरची समस्या देखील उद्भवते.
मंकीपॉक्सच्या आजाराची लक्षणे
मंकीपॉक्सच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, आळशीपणा, शरीरावर पुरळ येणे हे 2-3 आठवडे टिकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. मात्र काहीवेळा लहान मुलांसाठी आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या इतर लोकांसाठी ते घातक ठरू शकतं. गुंतागुंतांमध्ये न्यूमोनिया, एन्सेफलायटीस आणि कॉर्नियल इन्फेक्शन यांचाही समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार सध्या मृत्यूचे प्रमाण 3 ते 6 टक्के आहे.
काय आहेत उपाय?
या व्हायरसवर अद्याप कुठलंही रामबाण औषध आलेलं नाही. सध्या बाजारात असं कुठलंही औषध उपलब्ध नाही, जे या व्हायरसला मारू शकेल. याचा सिंड्रोमिक इलाज करण्यात येतो. जर या काळात ताप आला, तर तापाचं औषध, जर घाम येत असेल तर डिहायड्रेशनवरचा उपाय करून या आजाराचा सामना केला जातो. हा आपोआप बरा होणारा आजार आहे. काही दिवसांत शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या व्हायरसवर मात करते. मात्र त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती शरीरात चांगल्या स्वरुपात असणं गरजेचं असतं.