शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर, फडणवीसांनी अनेकांना दिला 'धक्का'

शिंदे-फडणवीस सरकारने अखेर आपलं खाते वाटप जाहीर केलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांना अनेक चांगली खाती मिळाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ मंडळींना मात्र फडणवीसांनी 'धक्का' दिला आहे.

ministry portfolio of shinde fadnavis government announced maharashtra politics bjp
शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर, फडणवीसांनी अनेकांना दिला 'धक्का'  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • शिंदे-फडणवीस सरकारने अखेर जाहीर केलं खातेवाटप
  • देवेंद्र फडणवीसांकडे अर्थ आणि गृह खातं
  • मुनगंटीवार, दादा भुसेंना मोठा धक्का

Ministry: मुंबई: राज्यातील नवनियुक्त शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Govt) खाते वाटपाला अखेर आज (14 ऑगस्ट) मुहूर्त मिळाला आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडून चार दिवसांहून अधिकचा काळ लोटला तरीही खातेवाटप काही जाहीर झालं नव्हतं. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात एक बैठक पार पडली. ज्यानंतर काही वेळातच खाते वाटप जाहीर झालं. या खाते वाटपात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह (Home) आणि अर्थ (Finance) ही अशी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. मात्र, या संपूर्ण खाते वाटपात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना मोठा धक्का दिला आहे. (ministry portfolio of shinde fadnavis government announced maharashtra politics bjp)

कोणाकडे कोणती खाती?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती

अधिक वाचा: शिंदे गट करुन दाखवणार अन् दादरमध्ये प्रति सेना भवन उभारणार

भाजपचे मंत्री

  1. राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  2. सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  3. चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  4. डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
  5. गिरीष महाजन- ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 
  6. रवींद्र  चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  7. अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  8. सुरेश खाडे- कामगार
  9. मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

    शिंदे गटातील मंत्री
     
  10. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता 
  11. दादा भुसे- बंदरे व खनिकर्म 
  12. संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
  13. संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  14. उदय सामंत- उद्योग
  15. प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  16. अब्दुल सत्तार- कृषी
  17. दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
  18. शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

    अधिक वाचा: "मग शिवसेना माझीय असं म्हणायचं का?" उदयनराजे असं का म्हणाले?

फडणवीसांना भाजपमधील कोणाकोणाला दिला दणका?

महाराष्ट्रात सत्ताबदल घडवून आणण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा सहभाग असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज झालेल्या खातेवाटपात देखील त्यांचाच वरचष्मा असल्याचं दिसून आलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भाजपमधील ज्येष्ठ मंत्र्यांना मात्र काहीसा धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यासारख्या ज्येष्ठ मंडळींना काहीशी दुय्यम खाती देण्यात आली आहेत. तर फडणवीसांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या काही मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली आहेत.

अधिक वाचा: ते माणसाला बाई आणि बाईला माणूस बनवतील"गडकरींची जोरदार बॅटिंग

फडणवीस सरकारच्या काळात ज्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचं असं अर्थ खातं होतं त्या मुनगंटीवारांची वने आणि सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय विभागावर बोळवण करण्यात आली आहे. तर याआधी फडणवीस सरकारच्या काळात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून ओळख असलेल्या आणि ज्यांच्याकडे महसूल खातं होतं अशा चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खातं सोपवण्यात आलं आहे.

दुसरीकडे फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे यांना मात्र चांगली खाती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 

अधिक वाचा: "...तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी"

२०१९ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना अत्यंत महत्त्वाचं असं महसूल खातं देण्यात आलं आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास खातं देण्यात आलं आहे. तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) सारखं अत्यंत महत्त्वाचं खाते सोपविण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदेंकडून समतोल राखण्याचा प्रयत्न

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यामध्ये दादा भुसे यांना मात्र काहीसं मागे सारण्यात आलं आहे. कारण ठाकरे सरकारमध्ये कृषी मंत्री असलेल्या भुसेंना बंदरे व खनिकर्म खातं देण्यात आलं आहे. तर कृषी सारखं अत्यंत महत्त्वाचं खातं हे अब्दुल सत्तार यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारांना मोठी लॉटरी लागली असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. तर शिंदे गटाची मुलूखमैदानी तोफ असणाऱ्या गुलाबरावांना त्यांच्याकडे याआधी असलेलं पाणीपुरवठा हेच खातं देण्यात आलं. तर उदय सामंत यांची मंत्री उद्योग मंत्रिपदी वर्णी लागली आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी