हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कळमनुरीचे असलेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना उद्धव ठाकरे यांनी चांगलाच दणका दिला आहे. बांगर यांच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. संतोष बांगर यांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ म्हणून ओळख होती. मात्र संतोष बांगर यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मोठा धक्का दिला आहे.
आता संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे.बांगर यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्याची मागणी संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्याकडे पक्षातील जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख या पदावरून काढण्यात आलं आहे. शिवसेनेच्या सुत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार तसंच जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं बांगर यांना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे.
अधिक वाचा- आषाढी एकादशीला मित्रांवर काळाचा घाला, नागपुरहून आलेल्या दोघांचा पंढरपुरात मृत्यू
आमदार संतोष बांगर हे 2009 पासून हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पदावर होते. मात्र बंडखोरी केल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलं आहे. आता बांगर यांची हकालपट्टी केल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून शिवसैनिकांची चाचणी करण्यात येत असल्याचंही समजतंय. येत्या दोन ते तीन दिवसातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंगोली जिल्ह्याचा नवीन जिल्हाप्रमुख जाहीर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे हिंगोलीत शिवसेनेचा नवीन जिल्हाप्रमुख कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संतोष बांगर हे बहुमत चाचणीच्या आदल्या दिवसापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत होते. मात्र बहुमत चाचणीच्या दिवशी बांगर हे बंडखोरांच्या बसमध्ये दिसले. बहुमत चाचणीला काही वेळ शिल्लक असताना बांगर यांनी अचानक बंडखोरी केली. त्यांच्या अचानक बदलेल्या भूमिकेमुळे अनेकांना धक्का बसला होता. मुख्य म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केला होता त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी संतोष बांगर ढसाढसा रडले होते.