मुंबई: घाटकोपरमध्ये (Ghatkopar) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 2500 किलोहून अधिक गोमांस (Beef) जप्त केलं आहे. या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. ANI वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. मुंबईतल्या घाटकोपर येथील देवनार परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करत असून अटक करण्यात आलेल्यांची चौकशी सुरू आहे.
रचला होता सापळा
घाटकोपरमधल्या देवनार परिसरात मालेगाव येथून आलेलं 2500 किलोहून अधिक गोमांस जप्त करण्यात आलं आहे. तीन ट्रकमधून हे गोमांस आणण्यात आलं होतं. या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. पशुकल्याण संस्थेनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुरूवारी ही कारवाई केली.
अधिक वाचा- बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल, फोनवर धक्कादायक खुलासे; एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?
पशुकल्याण संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सकाळी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर ( Ghatkopar Mankhurd Link ) सापळा रचला होता. आरोपींकडून तीन ट्रक जप्त करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Maharashtra | Police arrested 10 people and seized 3,000 kgs of beef from three trucks. Further investigation underway: Deonar police — ANI (@ANI) July 7, 2022
शफीक टाडाच्या मदतीनं मालेगाव येथून हे गोमांस आणण्यात आलं होतं. साजिद कुरेशी नावाच्या व्यक्तीला ते वितरित केलं जाणार होतं, असं आरोपींनी सांगितलं. अटक करण्यात आलेल्यांची अधिक चौकशी सुरू आहे.
पशुकल्याण संस्थेचे अधिकारी काय म्हणाले
जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि प्राण्यांवर क्रूरता कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबर 2021 मध्येही झाली होती अशीच कारवाई
2021 च्या डिसेंबर महिन्यात गोमांस मुंबई अहमदाबाद महामार्गावर 21 हजार किलो जप्त करण्यात आलं होतं. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलं होतं. तमिळनाडूहून ठाणे, मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरवर कारवाई करत तब्बल 21 हजार 18 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती.