अंघोळीसाठी तलावात 7 मित्र गेले पोहायला, परतले फक्त 5; दोघांचा बुडून मृत्यू

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 07, 2022 | 10:56 IST

आतापर्यंत एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

Mumbai Accident
दोन तरुणांचा बुडून मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुंबईत सध्या धो-धो पाऊस सुरू आहे.
  • मुसळधार पावसामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे.
  • तलावात अंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

 मुंबई: Mumbai Accident: मुंबईत सध्या धो-धो पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. दहिसरतल्या एका तलावात अंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं.  रात्री उशिरा बचावकार्य सुरू करण्यात आलं.

अपघाताची माहिती देताना मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. 

अधिक वाचा-  Naqvi Resigns : मुख्तार अब्बास नक्वी नवे उपराष्ट्रपती? मोदी मंत्रिमंडळात होतायत महत्त्वाचे फेरबदल

हे दोघे जण त्यांच्या पाच मित्रांसोबत अंघोळीसाठी या तलावात गेले होते. इतर सर्व मित्र सुरक्षित असल्याची माहिती मिळतेय. या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाल्याचं सांगितलं जात आहे. 

बोरिवलीतील गोराई येथील रहिवासी असलेले सात तरूण मंगळवारी रात्री मुसळधार पावसात वैशाली नगर येथील खाणीत पिकनिकसाठी गेले होते, अशी माहिती दहिस पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुढे पोलिसांनी सांगितलं की, तेथे पोहोचल्यानंतर खाणीत भरलेल्या पाण्यात उतरून तरुणांनी अंघोळ करण्यास सुरूवात केली. यादरम्यान यातील दोन तरुण खोल पाण्यात गेल्यानं बुडाले. घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या पथकानं शोधकार्य सुरू केलं. त्यानंतर रात्री उशिरा एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढला, तर दुसऱ्याचा शोध सुरू अद्याप सुरू आहे. 

19 वर्षीय शेखर पप्पू विश्वकर्मा असं मृत तरूणाचं नाव आहे. तर अजय जोगदंड अद्याप बेपत्ता आहे. जोगदंड हा रिक्षाचालक होता तर विश्वकर्मा बांधकामाची कामे करायचा. दहिसर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबईत मुसळधार पाऊस 

मुंबईत पुढच्या पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जोरदार पाऊस आजही कायम आहे. रात्रभर धो-धो पाऊस सुरू आहे. तसंच पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज आणि उद्या मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी