मुंबई: मुंबईत रात्रभर पावसाची संततधार सुरूच आहे. मुंबईत पुढच्या पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जोरदार पाऊस आजही कायम आहे. रात्रभर धो-धो पाऊस सुरू आहे. तसंच पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज आणि उद्या मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही येत्या 3-4 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आज पहाटे साडेपाच पर्यंत कुलाबा वेधशाळेत 95.4 मिमी तर सांताक्रुझमध्ये 96.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
#WATCH | Maharashtra | Andheri Subway waterlogged in Mumbai as rain continues to lash the city pic.twitter.com/7kiRhDVjel — ANI (@ANI) July 7, 2022
या ठिकाणी साचलं पाणी
अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचलं होतं. याव्यतिरिक्त सायन, माटुंगा भागातही काही प्रमाणात पाणी साचलं आहे.
#WATCH | Maharashtra: Rain lashes parts of Mumbai; visuals from Matunga area pic.twitter.com/7xe1cfAap3 — ANI (@ANI) July 7, 2022
लोकल सेवेवर परिणाम नाही
मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर अजिबात परिणाम झालेला नाही. सध्या मुंबई लोकल ट्रेन सुरळीत आहे. पश्चिम रेल्वे तसंच मध्य रेल्वेची वाहतुकही सुरळीत आहे. तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.
मुंबईत जोरदार पावसाची नोंद
मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्ये सांताक्रूझ येथे 634.3 मिलीमीटर, तर कुलाबा येथे 481.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत मंगळवार, बुधवार असे दोन दिवस पावसानं जोरदार बॅटिंग केली. दिवसभर मुसळधार पाऊस पडल्यानंतर रात्री ही पावसाचा जोर तसाच पाहायला मिळाला.