'या' कारणानं व्यावसायिकानं कारमध्येच स्वतःला संपवलं, पत्नी आणि मुलालाही पेटवण्याचा प्रयत्न

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 20, 2022 | 11:44 IST

Nagpur Crime News: रामराज भट असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे. आर्थिक अडचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur Crime News
व्यावसायिकाने कारमध्ये स्वतःला घेतले जाळून  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • नागपूरमध्ये (Nagpur) एका व्यावसायिकानं (Businessman) स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
  • बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
  • कोरोना काळात व्यवसायामध्ये मोठं नुकसान झाल्यानं व्यावसायिकानं हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर येतंय.

नागपूर: नागपूरमध्ये (Nagpur) एका व्यावसायिकानं (Businessman) स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. कोरोना काळात व्यवसायामध्ये मोठं नुकसान झाल्यानं व्यावसायिकानं हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर येतंय. इतकंच नाही तर व्यावसायिकानं स्वतःच्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते त्यातून बचावले आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

रामराज भट असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे. आर्थिक अडचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रामराज भट हे पत्नी संगीता आणि मुलगा नंदन यांच्यासोबत खापरी पुनर्वसन परिसरात गेले होते. यावेळी त्यांनी पत्नी आणि मुलासह सामूहिक आत्महत्या (Mass Suicide) करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी आणि मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खापरी इथल्या स्वामी विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

अधिक वाचा-  शिवसेनेला आणखी एक झटका, संसदेतही शिंदेशाही; गटनेतेपदी मुंबईकर खासदार

धक्कादायक म्हणजे भट यांनी मुलगा आणि पत्नीसह कारमध्येच पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. रामराज भट यांचा नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. ते विविध कंपन्यांना माल पुरवठा करायचे. कोरोनाच्या काळात त्यांना व्यवसायामध्ये प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानामुळे ते आर्थिक संकटात होते. भट यांचा मुलगा नंदन पेशानं इंजिनियर आहे. त्यांनी नंदनला काम करून घरासाठी हातभार लावण्यासाठी सांगितलं होतं. मात्र नंदन काम करण्यास तयार नव्हता.  त्यामुळे भट हे आणखीनच आर्थिक संकटात सापडले. 

रामराज भट यांनी आर्थिक विवेचनेतून सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी आणि मुलाला घेऊन कारमधून निघाले. त्यानंतर त्यांनी खापरी पुनर्वसन केंद्राजवळ पोहोचल्यावर त्यांनी आपली कार थांबवली. कार थांबवून त्यांनी दोघांना अॅसिडिटीच्या औषधाच्या नावावर विष पिण्यासाठी दिलं. मात्र पत्नी आणि मुलाला संशय आला. औषधाचा रंग काळा असल्यानं नंदननं ते घेण्यास नकार दिला. त्यानंतर कारमध्येच तिघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी भट यांनी पत्नी आणि मुलावर बाटलीतील  ज्वलनशील पदार्थ फवारला. त्या पदार्थामुळे कारमध्ये आग लागली. तेव्हा पत्नी आणि मुलगा कारमघून कसेबसे बाहेर पडले. पण भट यांचा गाडीतच जळून मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमी झालेल्या पत्नी आणि मुलाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी