Bhandara Crime: धक्कादायक! पुतण्याने काकाच्या नावावर काढले १६ लाखांचे कर्ज; बॅंक मॅनेजरसह पुतण्याला बेड्या

गावगाडा
Updated May 06, 2022 | 12:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Crime News In Marathi | पैशाच्या मोहासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान अशाच पैशाच्या मोहासाठी आपल्याच नातेवाईकांना आर्थिक गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे.

nephew took a loan of Rs 16 lakh in the name of his uncle by showing false documents 
पुतण्याने काकाच्या नावावर काढले १६ लाखांचे कर्ज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पैशाच्या मोहासाठी पुतण्याने काकाचा काढला काटा.
  • होंडा शोरूमसाठी पुतण्याने काकाच्या नावावर तब्बल १६ लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले.
  • कर्ज थकल्याच्या बॅंकेच्या एका नोटीसमुळे हे प्रकरण उघडकीस आले.

Crime News In Marathi | भंडारा : पैशाच्या मोहासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान अशाच पैशाच्या मोहासाठी आपल्याच नातेवाईकांना आर्थिक गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. इथे पुतण्याने आपल्याच काकाच्या नावावर कर्ज काढून काकाला अडचणीत आणले आहे. होंडा शोरूमसाठी (Honda Showroom) आरोपी पुतण्याने आपल्या काकाचे बनावट कागदपत्रे बॅंकेत सादर करून काकाच्या नावावर तब्बल १६ लाखांचे कर्ज घेतले. (nephew took a loan of Rs 16 lakh in the name of his uncle by showing false documents). 

अधिक वाचा : हे ५ परफ्यूम महिलांसाठी आहेत खूप खास

बॅंक मॅनेजरलाही अटक 

दरम्यान, या पुतण्याने आपल्या सख्या काकाची फसवणूक केल्याची घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत ही घटना घडल्याचे उघडकीस आले. या धक्कादायक घटनेप्रकरणी बॅंक मॅनेजरसह पुतण्याला साकोली पोलिसांनी अटक केली आहे. मोरेश्वर मेश्राम असे या मॅनेजरचे नाव आहे. तर मंगेश पंढरी पर्वते असे पराक्रमी पुतण्याचे नाव आहे. खोटी कागदपत्रे दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोघांनाही पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत.

काकाची मालमत्ता ठेवली गहाण 

होंडा शोरूमसाठी पुतण्याने काकाच्या नावावर तब्बल १६ लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. खोटी कागदपत्रे असून देखील बॅंक मॅनेजरच्या मेहरबानीने कर्ज मंजूर झाल्याचा संशय बळावल्याने साकोली पोलिसांनी दोघांनाही गजाआड केले. दरम्यान पुतणा मंगेश पर्वते याला होंडा शोरूम काढण्यासाठी १३ लाख रूपयांच्या रकमेची गरज होती. यासाठी त्याने बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेशी संपर्क साधला. लक्षणीय बाब म्हणजे कर्जासाठी स्वतःच्या मालकीची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवण्याची अट होती. 

बॅंकेची अट लक्षात घेऊन पुतण्याने गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील आपले काका रूपचंद भाऊराव पर्वते वय वर्ष ५५ यांच्या नावावर असलेली संपत्ती गहाण ठेवली. नवेगावबांध येथील गट क्र. ९४६/७ वरील प्लॉट क्र.२ वर घर बांधण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून १३ लाखांचे गृहकर्ज घेतले. काकाला कल्पनाही न देता हे कर्ज मंजूर करण्यात आले, प्रसंगी मॅनेजर मोरेश्वर मेश्राम याने त्याला मदत केली. 

कर्जाचे हफ्ते थकल्याने नोटीस

हे प्रकरण उघडकीस आले ते बॅंकेच्या एका नोटीसमुळे. कारण कर्जाचे हफ्ते थकल्याने बॅंकेने रूपचंद्र पर्वते यांना एक नोटीस पाठवली आणि सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या काकाने विचारपूस केली असता पुतण्याने ही बाब कबूल केली आहे. कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी परत ३ लाख रूपयांची मदत केली. मात्र आरोपी पुतण्याने पैसे कर्जाचे हफ्ते न भरता परस्पर वापरल्याने काकाने आरोपी पुतणा व बॅंक मॅनेजर यांच्याविरोधात साकोली पोलिसांत १६ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी मंगेश पर्वते व मोरेश्वर मेश्राम यांच्याविरूद्ध कलम ४२०, ४०९, ४६७, ४७१, ३४ भादंवी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी