महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांची अग्निपरीक्षा; भाजप नेत्याच्या हाती दोरी

गावगाडा
Updated Nov 20, 2021 | 12:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून 10 जागांसाठी दि. 21 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.

Ordeal of two ministers of Mahavikas Aghadi; Rope in the hands of BJP leader
महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांची अग्निपरिक्षा; भाजप नेत्याच्या हाती दोरी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उर्वरित 10 जागांसाठी उद्या मतदान
  • सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची परीक्षा
  • हायव्होल्टेज लढतीमुळे ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झाली.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेची रणधुमाळी सुरु आहे. बॅंकेच्या कऱ्हाड सोसायटी गटातुन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर यांचे सुपूत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर रिंगणात आहेत. तर पाटण विकास सोसायटी गटातून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईं यांची माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या सुपूत्र सत्यजित पाटणकर यांच्याशी लढत होणार आहे. राज्यात राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आहे. पण सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने शिवसेना आणि काॅंग्रेसला डावलून भाजपला जवळ केले आहे. त्यामुळे दोन मंत्र्यांचा विजय आणि पराजय भाजपच्या हाती असल्याने ही निवडणूक अतिशय रंगतदार आहे. (Ordeal of two ministers of Mahavikas Aghadi; Rope in the hands of BJP leader)

रामराजेंनी भाजपचे आमदार आणि खासदारांना केले बिनविरोध

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता आली आहे. रामराजेंनी भाजप खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जवळ करीत जिल्हा बॅंकेच्या ११ जागा बिनविरोध काढल्या. तर बँकेच्या उर्वरित 10 जागांसाठी दि. 21 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यात कराड, पाटण आणि जावली सोसायटी गटातमध्ये दिग्गज नेत्यांची लढत होत आहे.

मॅजिक फिगरसाठी भाजप नेत्यांची गरज

कराड सोसायटी गटातून अनेक वर्षे माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर निवडून येत होते. त्यांच्या निधनानंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दावा सांगून मैदानात उतरले आहेत. तर विलासकाकांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांनी या मतदारसंघाचा वारसदार मीच आहे. म्हणून शड्डू ठोकला आहे. पण दोघांकडे मॅजिक फिगर नसल्याने त्यांना भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या पाठिंब्याची गरज आहे. ते आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकताय यावर कराडचा निकाल लागणार आहे.

सत्ता समीकरणे बदलणार

पाटण सोसायटी मतदारसंघातून अनेक वर्षांपासून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर प्रतिनिधित्व करीत आहेत. यंदा त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दंड थोपटले आहेत. त्याचबरोबर जावली मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोध्द भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांची लढाई होत आहे. रांजणेंच्या करामतीमुळे आमदार शिंदेंना चांगले पळावे लागत आहे. कराड, पाटण आणि जावली तालुक्यातील अटीतटीची लढत होत आहे. बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदे यांच्यासाठी सोसायटी मतदार संघातील ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीमुळे भविष्यातील सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची सत्ता समीकरणेही बदलून जातील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी