Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मंत्रिपद नाही ते नाही, परिषदही नाही? राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत नवी माहिती उघड

गावगाडा
अमोल जोशी
Updated Aug 29, 2022 | 12:13 IST

मंत्रिपद नाही ते नाही, राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीतही पंकजा मुंडेंचे नाव नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

Pankaja Munde
पंकजा मुंडेंना मंत्रिपद नाही ते नाही, परिषदही नाही?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पंकजा मुंडेंना पुन्हा डावलले गेल्याची चर्चा
  • “राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव नाही”
  • राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा टोमणावजा सल्ला

Pankaja Munde: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या (Governor appointed MLC) यादीवर शिक्कामोर्तब होणार तरी कधी, हा महाविकास आघाडी सरकारच्या(MVA Government)  काळापासून निर्माण झालेल्या प्रश्नाचं आता उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लवकरच ही यादी जाहीर होणार असल्याची माहिती असून त्यात देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पसंतीच्या उमेदवारांची नावं असणार हे साहजिक आहे. मात्र अनेक दिवस सत्तेपासून आणि विधिमंडळापासून दूर असणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना अजून काही काळ अशीच प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. सध्या समोर येत असलेल्या यादीत पंकजा मुंडे यांचं नाव नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. 

नव्या यादीबद्दल चर्चा

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच तयार झाली होती आणि ती मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. मात्र या यादीला राज्यपालांनी मंजुरीच न दिल्यामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या. आता सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यादीत अनेक बदल केल्याचं सांगण्यात येत आहे. ही यादी नव्याने तयार करण्यात आली असून त्यात पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याची माहिती आमदार मिटकरी यांनी दिली आहे. ही यादी अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. मात्र त्याआधीच मिटकरी यांनी ही माहिती उघड केली आहे. 

पंकजा मुंडेंना टोला आणि सल्ला

या यादीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावता लगावता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा अप्रत्यक्ष सल्लाही दिला आहे. तिकीट द्यायचं आणि सुडाचं राजकारण करून पराभव करायचा, हे तंत्र लक्षात आल्यानंतर रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रोहिणी खडसेंना वेळीच ही बाब लक्षात आली. आता पंकजा मुंडेंनाही हे लक्षात आलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीत येण्याचं आमंत्रण दिल्याचं मानलं जात आहे. मुळात राज्यपालच भाजपचे आहेत. मात्र असं असूनही या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नसल्याचं आपल्याला समजलं आहे. आपल्या पक्षातील प्रामाणिक नेत्यांचे पंख कसे कापले जातात हे दिसत आहे, असं म्हणत त्यांनी राजकीय टोला लगावण्याचा प्रयत्न केला आहे. 

अधिक वाचा -ED ची नजर आता पवार कुटुंबियांवर, आमदार रोहित पवार आता रडारवर

पंकजा मुंडे कमबॅकच्या तयारीत

एकेकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या पंकजा मुंडे या सध्या भाजपात डावलल्या गेल्यामुळे नाराज असल्याची माहिती आहे. गेल्या विधानसभा निडवणुकीत परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली होती. गेल्या महिन्यात पुन्हा शिंदे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना डावलण्यात आलं. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतही त्यांना स्थान नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे पुढे काय निर्णय घेतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी