स्मृतिदिन : पराक्रमी अजेय योद्धा बाजीराव पेशवे

Peshwa Baji Rao : पहिले बाजीराव पेशवे यांचा आज स्मृतिदिन (बाजीराव पेशव पुण्यतिथी) आहे. बाजीराव पेशवे हे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र होते. राधाबाई या बाजीराव पेशव्यांच्या आई होत्या.

Peshwa Baji Rao first peshwa
स्मृतिदिन : पराक्रमी अजेय योद्धा बाजीराव पेशवे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्मृतिदिन : पराक्रमी अजेय योद्धा बाजीराव पेशवे
  • संपूर्ण कारकिर्दीत बाजीराव पेशवे एकही लढाई हरले नाही
  • बाजीराव पेशव्यांची फौज वेगाने हालचाली करण्यासाठी प्रसिद्ध

Peshwa Baji Rao : पहिले बाजीराव पेशवे यांचा आज स्मृतिदिन (बाजीराव पेशव पुण्यतिथी) आहे. बाजीराव पेशवे हे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र होते. राधाबाई या बाजीराव पेशव्यांच्या आई होत्या. बाजीराव पेशव्यांचा जन्म इंग्रजी कालगणनेनुसार १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला होता. वडिलांकडून युद्धकला आणि राजकारणाचे धडे गिरविणाऱ्या बाजीराव पेशव्यांना त्यांची कर्तबगारी ओळखून १७ एप्रिल १७२० रोजी पेशवाईची वस्त्रे दिली होती. 

बाजीरावांची फौज कर्नाटकमध्ये असताना निजामाने संधी साधली. त्याने सातारच्या छत्रपतींच्या राज्यावर हल्ला केला. निजामाने हल्ला करताच प्रत्युत्तरादाखल बाजीरावांनी थेट निजामाच्या राज्यावर हल्ला करुन खानदेश, बर्‍हाणपूर, सुरत जिंकून घेतले. बाजीरावांच्या सैन्याने निजामाच्या तोफखान्याला कुचकामी करुन टाकले. पेशव्यांनी दिलेल्या तडाख्यामुळे निजाम बेजार झाला आणि शरण आला. निजाम आणि पेशवे यांच्यात ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगाव येथे तह झाला. 

बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कार्यकाळात निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांना टक्कर देत मराठी राज्याला स्थैर्य मिळवून दिले. बाजीरावांच्या ४० वर्षांच्या आयुष्यातील २० वर्षे ही लढाया लढण्यात गेली. त्यात माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), पेशावर (१७३७), कंदहार (१७३७), काबुल (१७३७), बलुचिस्तान (१७३७), तसेच भारतातील भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७मे, इ.स. १७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कारकिर्दीत बाजीराव पेशवे एकही लढाई हरले नाही. 

बाजीराव पेशव्यांची फौज वेगाने हालचाली करण्यासाठी प्रसिद्ध होती. यामुळे शत्रूला सावध होऊन प्रतिकार करण्याची संधीच मिळत नव्हती. पालखेडमध्ये निजामाविरुद्धच्या लढाईत बाजीराव पेशव्यांच्या फौजेने एवढ्या वेगाने हालचाली केल्या की निजामाच्या सैन्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. निजामाची फौज मोठा शस्त्रसाठा मागे टाकून पळाली. या पराभवामुळे निजामाची दहशत एकदम कमी झाली आणि मुघलांमध्येही पेशव्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

एक लाख सैनिक आणि बाजीराव पेशवे यांच्यातून निवड करण्याची वेळ आली तर मी बाजीराव पेशव्याची निवड करणार असे छत्रपती शाहू महाराज म्हणायचे. छत्रपतींच्या या वक्तव्यातूनच बाजीराव पेशवे यांचे सामर्थ्य लक्षात येते. एवढा मोठा पराक्रम करणाऱ्या या झुंजार सेनानीचे नर्मदा नदीजवळ रावेरखेड येथे २८ एप्रिल १७४० रोजी निधन झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी