चौथीच्या धड्यातून धर्माचा प्रचार-प्रसार? सोशल मिडियावरील चर्चेनंतर 'बालभारती'चं स्पष्टीकरण

balbharati syllabus controversy : ‘‘इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील ‘ईदगाह’ धड्यासंदर्भात सोशल मिडियावर वाद निर्माण झाला आहे. कोणत्याही धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे याबाबत कोणताही विपर्यास करण्यात येऊ नये,’’ असे स्पष्टीकरण बालभारतीने दिले आहे.

Propagation of Dharma through Chapter 4? Explanation of 'Balbharati' after discussion on social media
चौथीच्या धड्यातून धर्माचा प्रचार-प्रसार? सोशल मिडियावरील चर्चेनंतर 'बालभारती'चं स्पष्टीकरण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चौथीच्या मराठीतील पाठ्यपुस्तकातील ईदगाह या धड्यावरून सोशल मीडियावर चर्चा
  • 'ईदगाह' हा धडा मुस्लिमाने लिहिला असल्यावरून वाद
  • कोणत्याही धर्माचा प्रचार करण्याचा हेतू नसल्याचे 'बालभारती'ने म्हटले आहे.

पुणे : ‘‘बालभारतीच्या (BalBharti) इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात (Marathi Book) धडा क्रमांक नऊमध्ये ‘ईदगाह’ समाविष्ट करण्यात आलेला आहे. या धड्यावरुन सोशल मिडियावर मागील काही दिवसांपासून उलटसुलट सुरू आहे. या धड्याच्या माध्यमातून बालभारती मुस्लीम धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असल्याचे आरोप करण्यात येत आहे. या वादात ब्राह्मण महासंघाने उघडी घेत हा धडा रद्द करण्यात यावा,’’ अशी मागणी केली होती.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की,  विविध समाज माध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. परंतु या पाठातून कोणत्याही धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे याबाबत कोणताही विपर्यास करण्यात येऊ नये,’’ अशी विनंती केली आहे.

ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘ईदगाह’ नावाचा धडा रद्द करण्यात यावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी बालभारतीकडे केली होती. या मागणीचे निवेदनही महासंघातर्फे बालभारतीला देण्यात आले होते. ‘‘इयत्ता चौथीच्या पुस्तकात ‘ईदगाह’ हा पाठ समाविष्ट आहे. या धड्यात मुस्लिम धर्मातील ईद बद्दल सविस्तर माहिती दिलेली असून त्यावरील प्रश्नांचा अभ्यासात समावेश केला आहे.

यावर बालभारतीच्यावतीने खुलासा करत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. बालभारतीचे संचालक पाटील म्हणाले, ‘‘इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील ‘ईदगाह’ धड्यासंदर्भात विविध समाज माध्यमांतून चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठीचे पाठ्यपुस्तक गेल्या सात वर्षांपासून अभ्यासले जात आहे. परंतु पाठ्यपुस्तकातील ‘ईदगाह’ या धडाच्या अनुषंगाने यापूर्वी कोणताही प्रकारचे आक्षेप बालभारतीकडे प्राप्त झालेले नाहीत. राष्ट्रीय उद्दिष्टे व गाभा घटक यामध्ये ‘सर्वधर्मसमभाव’ हे मूल्य समाविष्ट आहे.

‘ईदगाह’ हा धडा भारतीय साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिक प्रेमचंद यांच्या ‘मानसरोवर’ या कथा संग्रहातून निवडण्यात आला आहे. या धड्याचा मराठी अनुवाद संजीवनी खेर यांनी केलेला आहे. या धड्यातून कोणत्याही धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे याबाबत कोणताही विपर्यास करण्यात येऊ नये’’, असा खुलासा पाटील यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी