पुण्यात जुन्या वाड्याची कोसळली भिंत, तीन घरातल्या 11 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 14, 2022 | 13:16 IST

Old House Wall Collapse: मुसळधार पावसामुळे कोंडव्यातील जुना रिकामा वाडा कोसळला आहे. या वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडली.

Pune empty house collapsed
पुण्यात जुन्या वाड्याची भिंत कोसळली  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • पुणे (Pune) जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
  • हवामान विभागानं पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (Red Alert in Pune) जारी केला आहे.
  • पुण्यातही सतत मुसळधार पाऊस सुरू आहे.

पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  हवामान विभागानं पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (Red Alert in Pune) जारी केला आहे. पुण्यातही सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोंडव्यातील जुना रिकामा वाडा कोसळला आहे. या वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडली. त्यामुळे बाजूच्या घरातील 11 लोकं मलब्याखाली दबले गेले होते. सुदैवानं त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.  अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य राबवत त्यांची सुटका केली आहे. 

आज पुण्यातील कोंढवा बुद्रुक गावठाणातील दत्त मंदिरासमोर एका जुन्या वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडली. या दुर्घटनेत तीन घरातील 11 जण मलब्याखाली अडकले. या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य राबवलं. यात 11 जणांना सुखरूप रित्या बाहेर काढण्यात आलं. या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे. 

दोन दिवसांपूर्वीही घडली होती अशीच घटना 

मंगळवारी पुण्यात एका दुमजली इमारतीची भिंत कोसळली. नाना पेठेत ही घटना घडली होती. या अपघाताची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांकडून बचावकार्य तातडीनं सुरू करण्यात आलं होतं.  रात्री पुण्यातील नाना पेठेत दुमजली इमारतीची भिंत कोसळली. या घटनेत दोन जण जखमी झाले होते. तर दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तात्काळ बचावकार्य सुरू केलं होतं.

अधिक वाचा- 'म्हणून अजूनही मंत्र्यांचा शपथविधी होत नाही', राऊतांनी सांगितलं नेमकं कारण

पुण्यात जोरदार पाऊस 

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरात देखील मुसळधार पाऊस होत आहे. बुधवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील हंगामी पावसाने 300 मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे.  

शाळांना सुट्टी जाहीर 

पुणे जिल्ह्याला पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. अतिवृष्टी होण्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या शाळा बंद आहेत.   14 जुलै 2022 ला सर्व वर्गांच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. एक परिपत्रक काढून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तसंच पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी