विखेंनी जे भाजपकडून कमावलं ते राणेंना का नाही जमलं?

गावगाडा
रोहित गोळे
Updated Jun 05, 2019 | 08:57 IST

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संयमाने राजकारण करत भाजपकडून आपल्या पदरात बरंच काही पाडून घेतलं आहे. पण दुसरीकडे अशाच परिस्थितीत असताना राणेंना भाजपकडून फारसं काही कमावता आलं नाही. जाणून घेऊयात याची नेमकी कारणं.

Rane and vikhe_times now
विखेंनी जे भाजपकडून कमावलं ते राणेंना का नाही जमलं?  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात २०१४ पासून भाजप पर्व सुरु झालं आहे. कधीकाळी शिवसेनेच्या साथीने राज्यात आलेल्या भाजपने २०१४ साली विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवत सत्ता स्थापन केली आणि संपूर्ण राज्यात आपलं बस्तान बसवलं. मागील पाच वर्षात भाजपची पाळमुळं इतकी घट्ट झाली आहेत की, आता सत्तेचं राजकारण करताना शिवसेनेला देखील भाजपशी तडजोडी कराव्या लागत आहे. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की, आज राज्यात भाजपची केवढी ताकद वाढली आहे. यामुळेच गेल्या पाच वर्षात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपच्या छत्रछायेखाली जाऊन आपलं भलं करुन घेतलं आहे. तसं पाहायला गेलं तर ज्याची सत्ता असते तिकडे राजकीय नेत्यांचा ओढा असतोच. त्यामुळे आता भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. तसं पाहिल्यास प्रत्येक नेता हा आपआपल्या महत्त्वाकांक्षा जपण्यासाठीच धडपडत असतो. त्यातही तो जर विरोधी बाकांवरील नेता असेल तर त्याला सत्ताधारी बाकं नेहमीच खुणावत असतात. त्यामुळेच अनेक नेते सत्तेसाठी सहज पक्ष बदल करत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. याची अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण सध्याचं एक उदाहरण आपल्या सगळ्यांचा समोरच आहे. ते म्हणजे विखे-पाटील घराण्याचं. 

विखे-पाटील हे घराणं तसं गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या जवळचं मानलं जाणारं घराणं होतं. पण राजकीय हवा बदलल्याने या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तीनं सत्तेच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला मुलाला भाजपकडून खासदारकी आणि आता स्वत: भाजपच्या वाटेवर. यामुळे आपल्याला लक्षात येईल की, सत्तेची ताकद किती मोठी आहे. पण याशिवाय इथं काँग्रेसचा ढिसाळपणाही त्यांना नडला आहे. पण याच वेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अतिशय खुबीने मुलाला सत्ताधारी पक्षाची खासदारकी मिळवून दिली. तर आता स्वत: देखील मंत्रिपद घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसात विखे कुटुंबीय खूपच चर्चेत होतं. पण साधारण दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील असंच एक मोठं घराणं चर्चेत होतं. ते म्हणजे राणे कुटंब... परिस्थिती जवळपास सारखीच.. पण जे विखेंनी मिळवलं ते राणेंसारख्या दिग्गज नेत्याला का मिळवता आलं नाही? याचाच आपण या लेखातून थोडासा आढावा घेणार आहोत. 

राणे विखेंसारखी खेळी का करु शकले नाही? 

साधारण दोन वर्षांपूर्वी नारायण राणे हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यावेळी राणे हे आपल्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा रंगली होती. एवढंच नव्हे तर खुद्द राणेंनी यासाठी अनेकदा दिल्ली वाऱ्याही केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेटही घेतली होती. त्यामुळे राणे भाजपवासी होणार अशी दाट शक्यता होती. स्वत: नारायण राणे यांनी आपल्या विधानपरिषदेतील आमदारकीचा आणि काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपची वाट धरली होती. भाजप देखील राणेंसाठी सुरुवातीला अनुकूल होतं. पण अचानक सगळी समीकरणं बदलली आणि राणेंना वेटिंगवर ठेवण्यात आलं. तसं पाहता राणेंसाठी हा मोठा धक्काच होता. पण तरीही राणेंनी त्यावेळी थोडीशी संयमी भूमिका स्वीकारत भाजप नेत्यांशी चर्चा सुरु ठेवली होती. पण ज्यावेळी आपल्या इच्छा-आकांक्षा भाजपकडून पूर्ण होणार नाही हे जेव्हा राणेंना कळून चुकलं त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने हादरा बसला. त्यानंतर राणेंनी स्वत:चा पक्ष काढला. नाही म्हणायला भाजपच्या चिन्हावर त्यांना राज्यसभेत खासदारकी मिळाली. पण जे विखेंनी मिळवलं ते राणेंना त्यावेळी मिळवता आलं नाही. 

विखेंनी काय मिळवलं?   

राधाकृष्ण विखे यांना काँग्रेसनं विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पद देऊ केलं होतं. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्ष नेता म्हणून राजकारणात त्यांचं स्थान उंचावलं होतं. पण साधारण वर्षभरापासून ते भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. लोकसभा निवडणुकीत ऐन वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने खोडा घातल्याने मुलगा सुजय विखे याला खासदार करण्याचं स्वप्न भंगणार की काय अशी अवस्था राधाकृष्ण विखेंची झाली होती. पण अत्यंत लो-प्रोफाईल असणाऱ्या राधाकृष्ण विखे यांनी आपली सर्व शक्ती आणि युक्ती पणाला लावून स्वत:चं आणि मुलाचं राजकीय भवितव्य सुरक्षित केलं. जाणून घ्या विखेंनी या संपूर्ण राजकीय धबडग्यात नेमकं काय मिळवलं. 

 1. सर्वात प्रथम राधाकृष्ण विखेंच्या मुलाने सत्ताधारी पक्षातून लोकसभेची उमेदवारी मिळवली. (नंतर खासदार म्हणून निवडही झाली) 
 2. मुलाची खासदारकी निश्चित होताच राधाकृष्ण विखे यांनी स्वत:ही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि आपला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा करून घेतला. 
 3. आता राधाकृष्ण विखेंबाबत अशीही चर्चा आहे की, त्यांना लवकरच होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलं जाईल. 
 4. दुसरी चर्चा अशी आहे की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शह देण्यासाठी पुण्याचं पालकमंत्री पदही त्यांना दिलं जाऊ शकतं. 
 5. राधाकृष्ण विखेंनी या संपूर्ण राजकारणातून स्वत:चं राजकीय वजन तर वाढवलं आहेच. पण आपल्या जिल्ह्यातील राजकारणाला एक नवी दिशा देखील दिली आहे. 

(फोटो सौजन्य: Times Now)

 

राणेंनी काय गमावलं? 

नारायण राणे यांना दोन मोठ्या निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. (२०१४ विधानसभा आणि वांद्रे पोटनिवडणूक) त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांचं राजकीय वजन कमी झालं. मात्र, तरीही एवढ्या दिग्गज नेत्याला सभागृहाबाहेर ठेवणं काँग्रेसला योग्य न वाटल्याने त्यांनी विधानपरिषदेची आमदारकी देत त्यांना सभागृहात पाठवलं. पण त्यानंतर झपाट्याने राजकारण बदललं आणि साधारण वर्षभरातच राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. अनेक वर्ष सत्तेचा उपभोग घेतलेल्या नारायण राणेंना भाजपच्या निमित्ताने पुन्हा एकदा सत्ता खुणावू लागली होती. त्यामुळे सत्तेपासून बराच दूर असलेल्या काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली. पण राणेंनी जे आडाखे बांधले होते ते योग्य न ठरल्याने शेवटी त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. जाणून घ्या संपूर्ण राजकीय प्रक्रियेत राणेंनी काय गमावलं... 
 

 1. सर्वात आधी राणे हे सत्ताधारी पक्षात जाण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे ते स्वत: आणि त्यांची दोन्ही मुलं सत्तेपासून दूर राहिली. 
 2. राणेंना भाजपकडून स्वत:साठी मंत्रिपद, आपल्या एका मुलाला राज्यात राज्यमंत्रीपद आणि दुसऱ्या मुलाला खासदारकी हवी असल्याची त्यावेळी चर्चा होती. पण भाजपसोबतची सगळी चर्चा फिस्कटल्याने त्यांना यापैकी काहीही मिळालं नाही.
 3. राणे सत्ताधारी पक्षात आले असता त्यांचं कोकणातील राजकीय वजन पुन्हा वाढलं असतं. पण आता पूर्वीचं राजकीय वजन मिळविण्यासाठी त्यांना खूपच मेहनत करावी लागणार आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांना शिवसेनेकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. 
 4. जिथे विखेंनी अतिशय धूर्तपणे राजकारण साधलं. तिथेच मुळात राणे कमी पडल्याचं अनेक राजकीय जाणकार सांगतात. 

(फोटो सौजन्य: Twitter)

भाजपने विखेंना का स्वीकारलं? 

भाजपने राधाकृष्ण विखेंसारख्या नेत्याला आणि त्यांच्या कुटुंबाला फार सहजपणे स्वीकारलं. मुळात त्यामागे अनेक कारणंही होती म्हणा. कोणती आहे ती कारणं जाणून घ्या. 

 1. मुळात राधाकृष्ण विखे हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याला किंवा त्याच्या मुलाला आपल्या पक्षात घेतले असता त्याचा थेट परिणाम हा विरोधी पक्षावर होईल याची भाजपला जाण होती. तसंच त्यांच्यासोबत ते इतरही काँग्रेस आमदारांना घेऊन येतील याची भाजपला खात्री होती. कारण भविष्यात महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. 
 2. राधाकृष्ण विखे-पाटील हे तशा अर्थाने लो-प्रोफाइल नेते आहेत. मितभाषी आणि फारसे आक्रमक नाहीत. त्यामुळे येत्या काही काळात त्यांच्याकडून कुरघोड्यांचं राजकारण फारसं न होण्याची शक्यता. 
 3. अहमदनगर जिल्ह्यात विखे-पाटील कुटुंबाची सुरुवातीपासूनच राजकीय ताकद आहे. त्यामुळे विखे भाजपमध्ये आल्यास संपूर्ण जिल्हा भाजपला सहजपणे मिळू शकतो. 

भाजपने राणेंना का झुलवलं? 

जेवढ्या सरळसरळ भाजपने विखेंना स्वीकारलं तेवढ्या सहजतेने राणेंना स्वीकारलं नाही. अनेक दिवस चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवत भाजपने राणेंना सतत वेटिंगवर ठेवलं. पण असं वेटिंगवर ठेवण्याची नेमकी कारणं काय होती? जाणून घ्या... 

 1. नारायण राणे हे नावं जरी मोठं असलं तरी काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर राणेंची राजकीय ताकदही काही अर्थी कमी झाली होती. एकेकाळी शिवसेना सोडताना अनेक आमदार फोडणारे राणे आता काँग्रेसचे किती आमदार फोडू शकतील याची भाजप नेतृत्वाला शंकाच होती. तसंच मागील काही निवडणुकांमध्ये त्यांच्या आणि त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचा पराभव झाल्याने कोकणातही त्यांचं नेतृत्व जनतेने नाकारल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. 
 2. नारायण राणे यांनी स्वत: मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. त्यामुळे त्या खुर्चीची नेमकी ताकद काय आहे हे ते स्वत: जाणून आहेत. त्यामुळे राणे हे किती महत्त्वाकांक्षी आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यातच नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचं राजकारण हे फारच आक्रमक आहे. जे भाजपसारख्या पक्षाच्या पचनी पडणं तसं जडच आहे. त्यामुळेच भाजप नेतृत्वाने त्यावेळेस राणेंना कोणतीही आश्वासनं देखील दिली नाहीत आणि थेट विरोधही केला नाही. 
 3. राणेंनी आपला मुलगा नितेश राणे याच्यासाठी कणकवली हा हक्काचा मतदारसंघ सोडून २०१४ विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून निवडून लढवली होती. पण तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे स्वत:च्या जिल्ह्यातच त्यांची राजकीय ताकद किती कमी झाली आहे याची जाणीव भाजपला झाली होती. 
 4. सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे... शिवसेनेचा राणेंना असलेला विरोध. सत्ता टिकवण्यासाठी आणि भविष्यात सत्तेसाठी आपल्याला शिवसेनेशीच युती करावी लागणार याची जाण राज्यातील भाजप नेतृत्वाला पुरेपूर होती. त्यामुळे अशा परिस्थितीत राणेंना भाजपमध्ये थेट आणल्यास त्याचा परिणाम हा युतीवर देखील झाला असता. 

या सगळ्या कारणांमुळेच भाजपने राणेंना झुलवत ठेवलं. त्यामुळेच आपलं राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी राणेंना स्वत:चा पक्षही काढावा लागला. पण असं असलं तरीही राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हटलं जातं. राणे हे जनतेतून आलेले नेते असल्याने संघर्ष हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे ते राजकीय पटलावर पुन्हा यशस्वीही होऊ शकतात. पण यासाठी त्यांना अधिक मेहनतीची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी