व्वा.. बाळासाहेब, चांगलच पांग फेडलं !, उसाचा दर मागणाऱ्या शेतकऱ्यांना भल्या पहाटे ताब्यात घेतल्यानंतर राजू शेट्टींची संतप्त पोस्ट

गावगाडा
Updated Nov 06, 2021 | 13:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

चालु गळीत हंगामातील ऊस दर जाहीर न करता साखर कारखान्यांनी गाळप चालु करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या कारखान्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Raju Shetty's angry post
राजू शेट्टींची संतप्त पोस्ट  |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • ऊस दर जाहीर न करता साखर कारखान्यांचे गाळप सुरु
  • एक रक्कमी ऊस दर देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
  • पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भल्या पहाटे ताब्यात घेतले.

सातारा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी एक रक्कमी ऊस दर मिळावा, शेतीपंपाची वीजबिले साखर कारखान्यामार्फत वसुली थाबंवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंतनगर ता. कराड येथे  दिपावली पाडवा या दिवशी बेमुदत शिमगा आंदोलन करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भल्या पहाटे ताब्यात घेतले. या प्रशासनाच्या  कारवाईचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी निषेध नोंदवला आहे. (Raju Shetty's angry post after farmers demanding more price for sugarcane)

तसेच सोशल मिडियावर संतप्त पोस्ट टाकून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. पोस्टमध्ये शेट्टी यांनी म्हटले आहे की, आज बलिप्रतिपदा आमच्या शेतकऱ्यांचा राजा “ बळी “ त्याचा हादिवस. बटु वामनाने विश्वासघाताने बळीराजाला आज पाताळात गाडलं त्यावेळेपासून आम्ही बळीच्या राज्याची वाट बघतोय आणि याच दिवशी तुम्ही मात्र कायदेशीर रित्या उसाचा दर मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना पोलिसांकरवी भल्या पहाटे ताब्यात घेऊन त्यांना तुरुंगात डांबलं. “व्वाह बाळासाहेब चांगलच पांग फेडलं”. याच शेतकऱ्यांनी तुम्हाला मत देऊन अनेक वेळा आमदार केलं, मंत्री केलं त्याच्या उपकाराची अशी परतफेड कराल असं वाटलं नव्हतं.तुमच्या या कृत्यावरून तुम्ही बटु वामनाचेच वारसदार असल्याचेच सिद्ध केले आहे.

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे यंदाचा सन २०२१ /२२ चा ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. परंतु आज १५ दिवस उलटूनही काही दोन कारखाने वगळता कोणीही ऊस दर जाहीर केला नाही. ही बाब ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ चा भंग करणारी आहे. गेल्या वर्षी च्या हंगामात सुध्दा अशाच प्रकारे काही कारखान्यांनी ऊस दराचे बेकायदेशीर तुकडे करुन साखर आयुक्त यांना चुकीची व खोटी माहिती कळवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याबाबत पुरावे देऊनही शासनाकडून कोणताही कारवाई करत नसल्याने दिवशी पाडव्याच्या दिवशी सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार होते. तसे निवेदन संघटनेच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटेपासून पोलिसांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली. पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके, अर्जून साळुंखे, अनिल पवार, देवानंद पाटील, धनंजय महामुलकर,रमेश पिसाळ आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी