Rajya Sabha Results : भाजपचा ‘उम्मीद से बढके’ परफॉर्मन्स, आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी पक्षाला मिळाला ‘बुस्टर’

गावगाडा
अमोल जोशी
Updated Jun 11, 2022 | 16:50 IST

राज्यसभा निवडणुकीत भाजपने केलेली कामगिरी ही आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचं नैतिक बळ वाढवणारी ठरणार आहे.

Rajya Sabha Results
राज्यसभा निवडणूक निकाल  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • राज्यसभा निकालांमुळे वाढला भाजपचा आत्मविश्वास
  • आगामी राष्ट्रपती निवडणुकांमध्ये होणार फायदा
  • भाजपची सर्वोत्तम कामगिरी महाराष्ट्रात

Rajya Sabha Results | महाराष्ट्रासह देशभरात राज्यसभा निवडणुकीत भाजपने (BJP) केलेल्या कामगिरीमुळे (Performance) पक्षाचा आत्मविश्वास (Confidence) कमालीचा वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात सत्तेवर नसतानाही भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणणं हे पक्षाचं देशातील सर्वात मोठं यश मानलं जात असून आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याची चर्चा आहे. फ्लोअर मॅनेजमेंट करण्यात भाजप बहुतांश ठिकाणी यशस्वी झाली असून एखादा अपवाद वगळता भाजपनं त्यांच्या ताकदीच्या तुलनेत चांगला परफॉर्मन्स दिल्याचं चित्र आहे. 

भाजपची उत्तम कामगिरी

देशभरातील 15 राज्यांमध्ये एकूण 57 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या. यापैकी 41 उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्यामुळे खरी चुरस ही उरलेल्या 16 जागांवर होती. चार राज्यांमधील या 16 जागांवर कोण निवडून येणार हे विविध पक्षांच्या त्या त्या राज्यातील रणनितीवर अवलंबून असणार होतं. भाजपने त्यांच्याकडे असणाऱ्या 24 पैकी 22 जाागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे स्वतःच्या उमेदवारांचा सर्व ठिकाणी विजय तर पुरस्कृत उमेदवारांचा बहुतांश ठिकाणी विजय असं समीकरण जुळून आल्यामुळे सर्व पक्षांच्या तुलनेत भाजपचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं आहे. 

अपक्षांशी उत्तम समन्वय

भाजपने आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उत्तम समन्वय साधल्याचं या निवडणुकीतून दिसून आलं आहे. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अशाच प्रकार समन्वय भाजपला गरजेचा आहे. ज्या ठिकाणी अपक्षांची संख्या मोठी आहे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त अपक्षांना आपल्यासोबत ओढण्यात भाजपला यश आल्याचं चित्र आहे. अपक्ष, सहयोगी आणि काठावरचे अशा सर्वांना आपल्याकडे खेचण्यात आणि त्यांच्या मतांचा फायदा करून घेण्यात भाजपला मिळालेलं यश आगामी निवडणुकीसाठी फलदायी मानलं जात आहे. 

अधिक वाचा - Praful Patel : निश्चित झालेल्या कोट्याप्रमाणेच मतदान, राज्यसभा निवडणुकीत विजयानंतर प्रफुल पटेल यांचे विधान

राजस्थानमध्ये अपयश

महाराष्ट्र आणि कर्नाटकात जमलेली फ्लोअर मॅनेजमेंट राजस्थानमध्ये मात्र काहीशी फसल्याचं चित्र दिसलं. अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांची बेगमी भाजप करू शकला नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या फ्लोअर मॅनेजमेंटचं हे यश मानलं जात आहे. मात्र हा अपवाद वगळता भाजपने सर्वत्र उत्तम परफॉर्मन्स केला आहे. 

महाराष्ट्रातील कामगिरीचे सर्वाधिक कौतुक

भाजपसाठी महाराष्ट्रात मिळालेलं यश हे सर्वात मोठं मानलं जात आहे. महाराष्ट्रात सत्ता नसतानाही तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची बेगमी करणं हे भाजपसाठी मोठं आव्हान होतं. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम प्रकारे फ्लोअर मॅनेजमेंट करून तिसरा उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवल्याचं सिद्ध झालं आहे. महाविकास आघाडीकडे सत्ता असूनही त्यांना अपक्षांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळालं नाही. आपला विश्वासघात झाल्याचा दावा मविआतील काही नेते करत आहेत, मात्र आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका विचारात घेता पारडं भाजपच्या बाजूने झुकत असल्याचं चित्र आहे. 

अधिक वाचा - Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गाने माणसं जमा करण्यात यश, शरद पवार यांच्याकडून कौतुकाची थाप

पवारांकडून कौतुकाची थाप

महाराष्ट्रात महाविकास आघाडी तिसरी जागा मिळवण्याच्या प्रयत्नात होती. मात्र प्रत्यक्षात भाजपने ही जागा जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. फडणवीसांनी केलेल्या ‘जादू’चं पवारांनी उपरोधिकपणे कौतुक केलं असलं तरी अपक्षांना गळाला लावण्याचं मोठं आव्हान असल्याची जाणीव मविआ नेत्यांना या निमित्ताने झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी