मुंबई : राजद्रोहाच्या प्रकरणात जामिनासाठी राणा दाम्पत्यानं (Rana couple) आता मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) याचिका दाखल करणार आहे. आज दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामिनाची याचिका मागे घेणार आहे. तर पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या प्रकरणात एफआयआर रद्द करण्याची याचिका राणा दाम्पत्यानं उच्च न्यायालयात (High Court) केली होती. उच्च न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांची ही याचिका फेटाळली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, राणा दाम्पत्यानं पोलिसांना विरोध करणं गैर असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे.
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्यानं अटक झालेले आणि आता न्यायालयीन कोठडीत असलेलं राणा दाम्पत्याचे राजद्रोहाच्या प्रकरणात जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. राणा दाम्पत्य याच प्रकरणात आज अगोदर दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामीनाची याचिका मागे घेणार आहेत. त्यानंतर तातडीनं सकाळच्या सत्रातच जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणीसाठी प्रयत्न करणार आहेत. राजद्रोहाच्या आरोपात जामीन देण्याचे अधिकार दंडाधिकारी कोर्टाला नाहीत. त्यामुळे तिथला वेळ वाचवण्यासाठी दंडाधिकारी कोर्टातील याचिका मागे घेत थेट सत्र न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय राणा दाम्पत्यानं घेतला आहे.