अहमदनगर : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन आता हळूहळू राज्यभरात पसरत चालला आहे. ओमिक्रॉनने मुंबई, पुणेनंतर इतर जिल्ह्यातही प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात लस न घेणाऱ्या 9 लाखांहून अधिक लोकांच्या सर्व सुविधा बंद करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. (Ration will be stopped only for those who do not get vaccinated against covid, Ahmednagar Guardian Minister Hasan Mushrif's big statement)
कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरात 'ओमिक्रॉन'चा (Omicron) धोका पसरू लागला आहे. या नव्या व्हेरिएंटची लक्षणे निश्चित झाली असून त्याचा सर्वाधिक धोका 40 पेक्षा कमी वयोगटातील तरुणांनाच असल्याची बाब समोर आली आहे. प्रतिबंधित लस (Covid Vaccine) न घेतलेलेच सर्वाधिक बाधित झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती आहे. यामध्ये तब्बल 86 प्रवासी ओमिक्रोनचा उगम झालेल्या देशातून आले असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात एकही लस न घेणारे 9 लाख लोक आहेत. तसेच फक्त 1 डोस घेतला पण लस असूनही 5 लाख लोक आहेत ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही. अशा परिस्थितीत या लोकांना शोधून त्यांच्या गावात पोस्टर लावले जातील आणि त्यांच्या सर्व सुविधा बंद केल्या जातील, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले तर ओमिक्रॉनचा धोका कमी होईल, पण आता लस उपलब्ध असूनही लोक लस देत नाहीत, यामुळे सर्व सुविधा बंद केल्या पाहिजेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले.