Sambhaji Bhide on Sharad Pawar : भिडे गुरूजींनी केली शरद पवारांवर अशी टीका 

'शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  हे दोन्हीही नेते वंदनीय आहेत. पण त्यांचे विधान हे गोंधळल्यासारखे आहे. युद्ध भूमीत मरगळलेल्या अर्जुनासारखी त्यांची अवस्था झाली आहे.

sambhaji Bhide react on Sharad pawar comment on ayodhya Ram temple issue
भिडे गुरूजींनी केली शरद पवारांवर अशी टीका   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • 'शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  हे दोन्हीही नेते वंदनीय आहेत - भिडे
  • त्यांचे विधान हे गोंधळल्यासारखे आहे. युद्ध भूमीत मरगळलेल्या अर्जुनासारखी त्यांची अवस्था झाली आहे.
  • 'पवार बोलले ते मला वाईट वाटले. त्यांना निमंत्रण नसले तरी त्यांनी अयोध्येत जावे.

सांगली :  'शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  हे दोन्हीही नेते वंदनीय आहेत. पण त्यांचे विधान हे गोंधळल्यासारखे आहे. युद्ध भूमीत मरगळलेल्या अर्जुनासारखी त्यांची अवस्था झाली आहे. पवारांसारखी ज्ञानसंपन्न  व्यक्ती असे बोलत असेल तर त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत उपस्थित करता येईल. एसटी बंद करून, व्यवसाय बंद करून कोरोना जाणार आहे का,' असा सवाल शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे  (Sambhaji Bhide) यांनी उपस्थित केला. 'पवार बोलले ते मला वाईट वाटले. त्यांना निमंत्रण नसले तरी त्यांनी अयोध्येत जावे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील,' असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या आढावा दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनावर प्रतिक्रिया देताना म्हटले की,  आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल,’ या माध्यमातून पवारांनी केंद्र सरकारला टोला लगावला होता.  तसेच भूमीपूजनाचे निमंत्रण आले तरी मी जाणार नाही असेही शरद पवार बोलले होते. यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना  संभाजी भिडे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्र्यांनाही तो आग्रह धरू नये

यावेळी भिडे यांनी अयोध्येतील भूमिपूजनासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन भूमिपूजनाचा आग्रह धरू नये. बाबरी मशिदीचे पतन करण्यासाठी शिवसैनिक ऑनलाइन गेले नव्हते हे त्यांनी लक्षात ठेवावे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे काम चांगलेच आहे. मात्र, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं सांगतानाच शिवसैनिकांनी जाहीरपणे बाबरी मशिद पाडण्यात सहभाग घेतला होता. देशाच्या राजकारणातही शिवसेना महत्त्वाची आहे. हिंदुत्व टिकवणे आणि वाढवण्यासाठी शिवसेना अत्यंत महत्त्वाची असल्याचे भिडे यांनी यावेळी सांगितले. 


सुशांत सिंह प्रकरणावर बोलणे आयुष्य घालविण्यासारखे 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushantsingh rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून वाद रंगलेला असतानाच आता त्यात शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी उडी घेतली आहे. सुशांतसिंहबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य घालवण्यासारखच आहे. त्यामुळे या विषयावर बोलायलाच नको, असं संभाजी भिडे  (sambhaji bhide)यांनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना  संभाजी भिडे यांनी ही  प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज आपल्या समाजावर दुर्देवाने अभिनेते आणि अभिनेत्र्यांचा प्रभाव आहे. आपला समाज या अभिनेत्यांचा आदर्श घेतो. या नटनट्यांची लायकी काय आहे? त्यांची पात्रता काय? उंची किती तरीही १ अब्ज ३५ कोटी जनता त्यांना आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून स्वीकारतात. याचा अर्थ या देशाचं लवकरच वाटोळं होणार हे निश्चित आहे. त्याचंच हे निदर्शक आहे. सुशांतसिंह नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा चूक आहे. त्यावर बोलायलाच नको, असं संभाजी भिडे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी