नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या वकिलालाच सीबीआयने केली अटक

गावगाडा
Updated May 25, 2019 | 20:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर याच्यासोबत आणखी एकाला मुंबईतून अटक केली आहे. 

narendra_dabholkar_pti
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या वकिलालाच सीबीआयने केली अटक  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवगंत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी घडामोड समोर आली आहे. २०१३ साली दाभोलकर यांची हत्या झाली होती. याच खटल्याप्रकरणी आता सीबीआयने सनातन संस्थेचा वकील संजीव पुनाळेकर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबतच विक्रम भावे याला देखील मुंबईतून अटक करण्यात आली. दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी शरद कळसकर याच्या जबाबानंतर सीबीआयने आज (शनिवार) ही अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संजीव पुनाळेकर हा सनातन संघटनेचा वकील आणि प्रवक्ता आहे. पुनाळेकर हा दाभोलकर हत्या खटल्यातील आरोपींचा वकील होता. पण आता याच पुनाळेकरला सीबीआयने अटक केली आहे. या नरेंद्र दाभोलकर यांचा मारेकरी शरद कळसकर याने दिलेल्या जबाबनंतर सीबीआयने मुंबईतून संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली. विक्रम भावे हा संजीव पुनाळेकरच्या कार्यालयातच त्यांना अनेक गोष्टीत सहकार्य करायचा. पण याआधी विक्रम भावे याला ठाण्यातील गडकरी स्फोट प्रकरणी शिक्षाही झाली होती. ती शिक्षा भोगून विक्रम भावे बाहेर आल्यानंतर पुनाळेकरसोबत काम करत होता. 

सनातनच्या वकिलाला का अटक केलं? 

शूटर शरद कळसकर याने दिलेल्या जबाबात असं म्हटलं आहे की, दाभोलकरांच्या हत्येसाठी जे पिस्तुल वापरण्यात आलं होतं, ते नष्ट करण्यासाठी मी संजीव पुनाळेकरांकडे दिलं होतं. ते त्यांनी विक्रम भावे याच्याकडे दिलं. त्यानंतर दोघांनी ते पिस्तुल नष्ट केलं.' असा जबाब शरद कळसकर याने दिल्यानंतर सीबीआयने त्यांच्याकडील पुराव्याशी तपासणी करून त्यानंतरच वकील संजीव पुनाळेकरला अटक केली. 

दरम्यान, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल अद्याप पोलिसांना सापडलेलं नाही. कारण की, ते नष्ट करण्यात आलं आहे. मुंबईतील खाडी परिसरात हे पिस्तुल विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर याने नष्ट केल्याचं शूटरचं म्हणणं आहे. 

मुखवटा चढवून वावरणाऱ्या पुनाळेकरला अटक 

दुसरीकडे, या खटल्यातील अनेक फरार आरोपी आणि मारेकऱ्यांच्या संपर्कात देखील पुनाळेकर असल्याचं बोललं जात आहे. याआधी अटक केलेल्या अनेक आरोपींची बाजू हा पुनाळेकरच लढवत होता. त्यामुळे आता पुनाळेकरची अटक ही फार महत्त्वाची ठरू शकते. या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला मोठी दिशा मिळू शकते. संजीव पुनाळेकर या गेली अनेक वर्ष पोलिसांसमोर आणि मीडियासमोर मुखवटा चढवून वागत होता. पण अखेर मारेकऱ्यानेच हत्येसंबंधी माहिती दिल्यानंतर सीबीआयने पुनाळेकरच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

सनातन संस्थेकडून पुनाळेकरच्या अटकेचा निषेध

याप्रकरणी सनातन संस्थेने मात्र या अटकेचा निषेध केला आहे. पुनाळेकरला अटक करणं हे मोठं षडयंत्र असल्याचं सनातन संस्थेने म्हटलं आहे. या अटक प्रकरणात आपण पुनाळेकरच्या पाठीशी असल्याचं देखील सनातनने स्पष्ट केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या वकिलालाच सीबीआयने केली अटक Description: नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर याच्यासोबत आणखी एकाला मुंबईतून अटक केली आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles