राज्यात 5-6 महिन्यात मध्यवर्ती निवडणुका होणार?, शरद पवार यांनी NCPच्या आमदारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 04, 2022 | 08:18 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना काही सूचना दिल्या आहेत.

sharad pawar
शरद पवार 
थोडं पण कामाचं
  • राज्यात सध्या शिंदे सरकारची सत्ता आहे.
  • शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना काही सूचना दिल्या आहेत.
  • विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

मुंबई:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेतली. राज्यात सध्या शिंदे सरकारची सत्ता आहे. मात्र आज म्हणजेच सोमवारी शिंदे सरकारची विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. पण त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना काही सूचना दिल्या आहेत. मध्यवधी निवडणुकीसाठी तयारी करा, अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या आमदारांना सांगितलं आहे. 

सध्या राज्यात स्थापित झालेलं सरकार सहा महिन्यांत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिली. आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. 

काय म्हणाले शरद पवार 

राज्यातलं शिंदे सरकार जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही आहे. पाच ते सहा महिनेचं हे सरकार टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. जरी आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी आपआपल्या मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या, अशी सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिली. तसंच राज्यात स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये नाराज आमदारांची संख्या जास्त आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होईल आणि ते समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार पुन्हा माघारी परतण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच सरकार पडलं तर मध्यवर्ती निवडणुका लागतील त्यामुळे तयारीला आतापासून सुरुवात करा, असं मार्गदर्शन शरद पवारांनी आमदारांच्या बैठकीत केलं आहे. 


अजित पवार असतील विरोधी पक्षनेतेपदी?

दरम्यान विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली. यामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती समोर येतेय. या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक काही वेळापूर्वी संपली होती. या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाच प्रस्ताव आमदारांकडून देण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा- Bank FD: पीएनबी, एचडीएफसी, एसबीआय या बॅंकांमध्ये कोणती बॅंक एफडीवर सर्वाधिक व्याज देतेय ते जाणून घ्या

भाजप आणि बंडखोर शिवसेना आमदारांची पार पडली बैठक 

रविवारी भाजप आणि शिवसेना बंडखोर आमदारांची ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आज होणाऱ्या बहुमत चाचणी संदर्भात चर्चा आणि आमदारांना मार्गदर्शन केलं गेलं. आज होणारी बहुमत चाचणीमध्ये कोणतीही चूक होऊ नये यावर दोन्ही गटांच्या आमदारांना विशेष सूचना देण्यात आल्या. 

अधिक वाचा- ITR Filing: कमी पगार असूनही टीडीएस कापला गेला आहे, नो टेन्शन! असा मिळेल रिफंड

या बैठकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं. बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सर्व आमदारांचे अभिनंदन करण्यात आलं.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी