मुंबई : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. आज दुपारी आपल्या पाठिंब्याचे पत्र घेऊन एकनाथ शिंदे मुंबईत येणार होते. परंतु राज्यपाल्यांना कोरोनाची लागण झाल्याने कोश्यारी यांचा प्रभार गोव्यातील राज्यपालांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहेत. यामुळे शिंदे मुंबईत येण्याऐवजी गोव्यात जाणार आहेत. महाराष्ट्रात आल्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे शिंदे गुवाहाटीवरून गोव्याला जाणार आहेत. परंतु राजकीय तज्ञांच्या मते, राज्यपाल प्रभार देताना तांत्रिक अडचणी येणार आहेत.
जर एखाद्या राज्याचे राज्यपाल हे दहा दिवस सुट्टीवर असले तर असतील तर दुसऱ्या राज्यपालांकडे चार्ज देण्यात येतो. राज्यपाल्यांचा प्रभार दुसऱ्या राज्यपालांना देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींकडे असतो. राज्यपाल हे निर्णय घेण्यास सक्षम स्थितीत नसतील तर रिक्त झालेल्या पदावर नवे राज्यपाल नियुक्त करणे किवा तात्पुरती व्यवस्था म्हणून अतिरिक्त पदभार सोपवणे याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. कोरोना झाल्यावर राज्यपालांचा पदभार दुसऱ्याकडे देऊ शकतात किंवा राज्यपांचे OSD पत्र घेऊन व्हिडिओ कॉलवर राज्यपालांशी संवाद साधून प्रश्न सोडवू शकतात. ज्या पद्धतीने सही होऊ शकते त्या पद्धतीने हे शक्य आहे.
दरम्यान, कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील दोन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना आज सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरते. सध्या सुरू असलेल्या राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यपाल राज्य सरकारला विश्वास मत सिद्ध करण्याच्या सूचना देण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला किमान सात दिवसांचा अवधी मिळाला असल्याचे म्हटले जात आहे.