'रयत'च्या अध्यक्षपदावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार आमने-सामने

साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आमनेसामने आले आहेत. त्याचे कारण ठरले रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. आ. महेश शिंदे मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करताना दिसून येत आहेत.

Shiv Sena-NCP MLAs face-to-face on the chairmanship of 'Rayat'
'रयत'च्या अध्यक्षपदावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार आमने-सामने  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वारंवार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संघर्ष होत आहे.
  • शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यात रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदावरुन आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत.
  • आपण किती बोलतो याचे भान ठेवावे, असाही सल्ला शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना दिला.

सातारा : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार  (mahavikas aghadi government) आहे. राज्य पातळीवर तिन्ही पक्षातील नेते एकामेकांशी जुळवून घेत आहेत. मात्र, सातारा (satara) जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वारंवार शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीच्या (ncp) आमदारांमध्ये संघर्ष होत आहे. सध्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (mahesh shinde) आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांच्यात साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदावरुन आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. (Shiv Sena-NCP MLAs face-to-face on the chairmanship of 'Rayat' )

दोन दिवसांपूर्वी काटकरवाडी (ता. खटाव) येथे झालेल्या कार्यक्रमात महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्था ही आमच्या हक्काची संस्था असून देखील गेल्या सात वर्षांत जिल्ह्यातील एकाही तरुणाला या संस्थेत रोजगार मिळालेला नाही. काही नेते 'रयत'मध्ये संचालक म्हणून जातात आणि जिल्ह्यातील एकाही युवकाला नोकरी लागत नाही. त्याला नोकरी लागायला चाळीस-चाळीस लाख रुपये मागितले जातात, ही मोठी शोकांतिका आहे, असे नाव न घेता शशिकांत शिंदे  यांच्यावर टिका केली. तसेच रयत शिक्षण संस्था सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या पैशातून उभी राहिलेली आहे. या संस्थेचा कारभार मुख्यमंत्र्यांच्या हातात येऊन ती पुन्हा सर्वसामान्यांची झाली पाहिजे, अशी मागणी महेश शिंदे यांनी केली.  

यावर शशिकांत शिंदे यांनी पलटवार करत असताना  शरद पवारांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी. चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून नाहक बदनामी करू नका. अन्यथा, तुमचे स्वतःचे राजकारण संपेल, असा इशारा देत आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

शशिकांत शिंदे म्हणाले, संगणकापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत अनेक प्रकल्प शरद पवारच अध्यक्ष झाल्यापासून या संस्थेत सुरु केले आहेत. शासकीय अनुदान व्यतिरिक्त निधी उभा करण्याची किमया या महाराष्ट्रात त्यांच्याच माध्यमातून झाले आहे. अनेक लोक इतर संस्थेचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचे योगदान आणि शरद पवार यांचे रयत मधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी. आपण किती बोलतो याचे भान ठेवावे, असाही सल्ला शशिकांत शिंदे यांनी दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी