सोलापूरमध्ये १६ वर्षाच्या मुलीवर तब्बल १० जणांकडून तब्बल ६ महिने सामूहिक बलात्कार 

सोलापूरमध्ये एका १६ वर्षाच्या मुलीवर तब्बल १० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 

solapur minor girl raped by 10 persons from 6 months
सोलापूरमध्ये १६ वर्षाच्या मुलीवर तब्बल १० जणांकडून अनेक महिने सामूहिक बलात्कार  (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Getty Images

सोलापूर: लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी सर्व कायदे असूनही अशा घटनांना आळा बसलेला दिसत नाही. अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. इथे एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सुमारे ६ महिन्यांपासून तब्बल १० जण सामूहिक बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, ही घटना मंगळवारी उघडकीस आली. मुलगी एका मंदिराच्या बाहेर बसून प्रचंड रडत होती. हे पाहून लोकांनी तिची विचारपूस केली आणि जेव्हा तिच्याकडून त्यांना बलात्काराच्या घटनेबाबत समजलं तेव्हा त्यांनी तात्काळ याबाबत  पोलिसांना माहिती दिली. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मुलगी खूपच घाबरली होती. मात्र, नंतर पोलिसांनी जेव्हा तिला विश्वासघात घेऊन  धीर दिला त्यानंतर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. दरम्यान, तिच्या तक्रारीनंतर सर्व १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यापैकी ५ जणांना अटकही करण्यात आली आहे. तर ५ आरोपी मात्र अद्यापही फरारच आहेत. 

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार ती आरोपींपैकी काही जणांना आधीपासूनच ओळखत होती. याच लोकांनी सुरुवातीला तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी तिला अशीही धमकी दिली की, या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यानंतर, इतरही आरोपी या गुन्ह्यात सामील झाले. जे तिला सलग ६ महिने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करत होते. 

आरोपीपैकी काही जण हे ऑटो रिक्षा चालकही असल्याचं समजतं आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर ती आपल्या आईसोबतच राहत होती. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी ही तिच्या आईवरच होती. अनेकदा कामानिमित तिची आई घराबाहेर असायची. याच गोष्टीचा फायदा घेऊन सुरुवातीला आरोपींनी मुलीला भुलवून तिच्यावर बलात्कार केला. 

दरम्यान,  याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच आरोपींविरुद्ध  सामूहिक बलात्काराचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी