मुंबई : काही दिवसांवर आलेल्या एसएससी आणि एचएससीच्या परीक्षांमध्ये यंदा सवलतीच्या कलागुणांचा पेच सुटला असून, शासकीय चित्रकला परीक्षा ऑनलाइन होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. दरम्यान सवलतीच्या क्रीडा गुणांसंदर्भात अद्यापही काही निर्णय झालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (SSC HSC Exam discount online test for discounted art points !, sports marks remain sharp)
कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे गेल्या २ वर्षांत शाळाच बंद असल्याने दहावी व बारावीच्या या विद्यार्थ्यांना कोणत्याही क्रीडाप्रकारात भाग घेणे, सहभाग दर्शविणे शक्य झाले नाही. महाराष्ट्र राज्यात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता सहावीपासून जिल्हास्तरीय आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धांमधील सहभाग आणि स्पर्धेतील यशासाठी गुण दिले जातात. त्यामध्ये सहावी, सातवीतील जिल्हा लेव्हलवरील सहभागासाठी पाच गुण, राज्य लेव्हलवर दहा गुण, राष्ट्रीय लेव्हलवर सहभागासाठी दहा आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी १५ गुण दिले जातात. आंतरराष्ट्रीय लेव्हलवर विद्यार्थी खेळला, तर त्याला २० ते २५ गुण दिले जातात. या गुणांमुळे हजारो विद्यार्थ्यांना दर वर्षी लाभ मिळतो.
राज्यभरात कोरोना आणि त्यानंतर आलेल्य ओमिक्राॅनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष क्रीडास्पर्धांत, प्रकारांत सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र यामुळे ते दहावी बारावीच्या वर्षांत सवलतीच्या क्रीडागुणांपासून वंचित राहू नयेत अशी अपेक्षा क्रीडा व युवक सेवा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी यंदाच्या दहावी बारावी परीक्षांमध्ये, विद्यार्थ्यांना यापूर्वी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडाप्रकारांत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण द्यावेत आणि तयातही नियमावली जाहीर करावी अशी मागणी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.