ST Workers Strike : साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, दोन गटात झालेल्या राड्यात एसटी नियंत्रक जखमी

 सातार्‍यात एसटी कर्मचार्‍यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून संपाच्या नवव्या दिवशी त्याला गालबोट लागले. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण करत दगड डोक्यात घालून रक्तबंबाळ केले. या सर्व घटनेमुळे सातारा बसस्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले 

ST Workers Strike: Violent turn of ST workers' agitation in Satara, ST controller injured in a clash between two groups
ST Workers Strike : साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, दोन गटात झालेल्या राड्यात एसटी नियंत्रक जखमी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सातार्‍यात एसटी कर्मचार्‍यांच्या संपाच्या नवव्या दिवशी गालबोट
  • एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण करत दगड डोक्यात घालून रक्तबंबाळ केले.
  • बसस्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले 

ST Workers Strike । सातारा : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या ९ दिवसांपासून संप पुकारला आहे. दरम्यान, राज्यभर सर्वत्र शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला आज साताऱ्यात गालबोट लागले. कर्मचाऱ्यांच्या दोन गटात झालेल्या राड्यात दगडाने मारहाण केल्याची घटना घडली. यात एसटी नियंत्रकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (ST Workers Strike: Violent turn of ST workers' agitation in Satara, ST controller injured in a clash between two groups)

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. काल उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.

एसटी वाहक शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले

सातार्‍यात एसटी कर्मचार्‍यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून संपाच्या नवव्या दिवशी मंगळवारी दुपारी चार वाजता मात्र इन गेट परिसरात या संपाला गालबोट लागले.एसटीचा संप सुरू असतानाही एसटी वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते. यावर इतर संपकरी कर्मचार्‍यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा त्यांना केली  व त्यातूनच वादाला तोंड फुटले. किरकोळ बाचाबाची झाल्यानंतर पुढे त्याचे हाणामारीत पर्यावसन झाले.

एसटी नियंत्रकाच्या डोक्यात दगड घातला

सातारा बस डेपोमध्ये नियंत्रक म्हणून अमित चिकणे सेवा बजावत आहेत. वाहक नियंत्रकामध्ये शिवशाही नेण्यावरुन वाद विकोपाला गेला व त्याचवेळी पवार याने चिकणे यांच्या डोक्यात दगड घालून रक्तबंबाळ केले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. चिकणे या घटनेत जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी येथील क्रांतिसिंह नानापाटील रुग्णालयात (सिव्हील) उपचार सुरू करण्यात आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व सिव्हीलमध्ये धाव घेतली. सांयकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, सातार्‍यातील झालेल्या या राड्यामुळे हे प्रकरण शांत होणार की आणखी चिघळणार? याकडे लक्ष लागले आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी