मुंबई: Rise in swine flu cases In Mumbai City: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूचे (Swine flu) रूग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत इन्फ्लूएंझा H1N1 चाचणीची मागणी देखील वाढत आहे. तसेच चाचणीच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी देखील जोर धरत आहे. मुंबई शहरात H1N1 चाचणीची किंमत रु. 4,000 ते रु. 5,000 पर्यंत असते. ज्या कुटुंबांवर एकापेक्षा जास्त व्यक्तींची चाचणी करावी लागते अशावेळी कुटुंबावर मोठा भार येतो.
TOI नं दिलेल्या रिपोर्टनुसार, काही अधिकार्यांनी स्वाईन फ्लूच्या चाचणीच्या किंमती नियमित करण्याचा मुद्दा सध्याच्या राज्य सरकारकडे उपस्थित केला होता. मात्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्याचवेळी आरोग्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत या प्रकरणाच्या फेरविचाराची मंजुरीही मिळाली नाही.
अधिक वाचा- राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफुस, विरोधी पक्षेनेतेपदावरून जयंत पाटील नाराज
जुलै महिन्यात मुंबईत स्वाईन फ्लूचे 105 रूग्ण
विशेष म्हणजे या वर्षी स्वाईन फ्लूच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. जून महिन्यात स्वाईन फ्लूचे केवळ दोनच प्रकरण समोर आलं होतं. मात्र जुलै महिन्यात या रूग्णांची संख्या 105 वर पोहोचली. त्याच वेळी गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये H1N1 च्या 21 रुग्णांची नोंद झाली होती. या आकडेवारीनुसार , जुलै महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये जवळपास पाच पटीने वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे.
मुंबई पालिकेची वाढली चिंता
गेल्या एका आठवड्यात मुंबईत स्वाईन फ्लूचे 43 इतके रूग्ण होते. तर मलेरियाचे 166 आणि गॅस्ट्रोचे रूग्ण 155 इतकी वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस या पावसाळी आजारांनी बाधित झालेले रूग्ण आढळून येत आहे. या रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यामुळे मुंबई पालिकेची (Mumbai Municipal Corporation) चिंता वाढली आहे.
2009 मध्ये इतकी होती चाचणीची किंमत
TOI नं दिलेल्या रिपोर्टनुसार, राज्याच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, जेव्हा 2009 मध्ये स्वाईन फ्लू समोर आला तेव्हा चाचणीची किंमत सुमारे 5,000 रुपये होती. मात्र अधिक लॅबनी याच्या चाचण्या सुरू केल्याने त्याची किंमत कमी झाली. 2015 मध्ये, जेव्हा स्वाईन फ्लूमध्ये देशव्यापी वाढ झाली तेव्हा आरोग्य सेवा महासंचालकांनी राज्यांना सांगितलं की, चाचणी दर 2,500 रुपयांपेक्षा जास्त नसावा. मात्र अजूनही, लॅब खूप जास्त शुल्क आकारत असल्याचं अधिकारी म्हणाले.
या रूग्णालयात मोफत चाचणी
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मोफत चाचणी करण्याची सुविधा आहे. मात्र केवळ श्वास घेण्यास त्रास होणं, उच्च रक्तदाब, नखांचा रंग मंदावणे ही गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाच चाचणी करता येते.
जून महिन्यात रूग्णांमध्ये झालेली वाढ
जून महिन्यात मलेरियाचे 350, लेप्टोचे 12, डेंग्यू 39, गॅस्ट्रो 543, हिपेटायटिस 64, चिकनगुनिया 1 तर स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले होते. बाधित रूग्णांचा आकडा पाहता जुलै महिन्यात पावसाळी आजारांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं चित्र आहे.