Corona crisis : जून महिन्यात कोरोनाची लाट येण्याचा टास्क फोर्सचा अंदाज, मास्क पुन्हा अनिवार्य होणार?

गावगाडा
भरत जाधव
Updated Apr 27, 2022 | 09:02 IST

येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Task Force predicts corona surge in June
कोरोना संकट; राज्यात परत होऊ शकते मास्कची सक्ती  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यता.
  • राज्यातील विविध भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
  • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी मास्क सक्ती होण्याची शक्यता.

मुंबई : कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेतून राज्य सावरल्यानंतर कोरोना प्रतिबंधामध्ये महत्त्वाच्या ठरलेल्या मास्कची (Mask) सक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. गुढीपाडव्यापासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात सुद्धा आले होतो. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या (patients) वाढू लागल्याने राज्यात पुन्हा मास्क सक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य टास्क फोर्सने (State Task Force) मुख्यमंत्र्यांकडे (CM) दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, कनार्टक आणि या इतर राज्यातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. ही बाब लक्षात घेत 'महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स'च्या सदस्यांची विशेष बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर टास्क फोर्सच्या सदस्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा एक प्रस्ताव सादर केल्याची माहिती हाती आली आहे.

ज्यात प्रामुख्याने राज्यात मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बैठकीत टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी तसेच इतर सदस्य उपस्थित होते. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेत मास्कचा वापर आवश्यकच असून किमान बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करावे, असे टास्क फोर्स सदस्यांचे म्हणणे आहे. विशेषतः चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी मास्क सक्ती असावी, असे मत या सदस्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर विमान कंपन्या प्रवाशांना मास्क घालण्याविषयी वारंवार सांगतात, तशाच पद्धतीने खासगी आणि सरकारी रुग्णालयातही तातडीने मास्कचा वापर प्राधान्याने सुरू करण्याविषयी सूचना देण्यात आल्याचे कळते. 

चाचण्यांवर भर देणे आवश्यक

राज्यात सध्या कोरोनाच्या चाचण्या कमी होत असल्याकडे या सदस्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे चाचण्याची संख्या वाढविण्यावर भर देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सुचविण्यात आले आहे. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वतःला घरातच विलग करत आहे. अनेकजण आरटीपीसीआर करणे टाळत असून त्या चाचण्यांवर भर देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

बुस्टरचे अंतर कमी करा

लशीच्या दुसऱ्या मात्रेनंतर बूस्टर मात्रा घेण्यासाठी असलेले २७० दिवसांचे अंतर कमी करून १८० दिवसांवर आणावे, जिनोम सिक्वेन्सिंगचे निकाल वेळेवर मिळणेही गरजेचे असल्याने अशा प्रयोगशाळाची संख्या वाढवावी, अशी मागणी नोंदवण्यात आल्याचे कळते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी