ठाणे: Swine flu outbreak in Thane: ठाणे जिल्ह्यात (Thane district) गेल्या 20 दिवसांपासून स्वाईन फ्लूचे (swine flu) संकट गंभीर होत आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात गेल्या तीन दिवसांत स्वाईन फ्लूचे 52 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर स्वाईन फ्लूमुळे मृत्यू होणारी संख्याही पाचवर गेली आहे. अशा स्थितीत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या (Swine flu patients) 402 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच स्वाईन फ्लूने जोर धरला आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभागावर ताण वाढत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात सणासुदीच्या काळात रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
अधिक वाचा- मुंबई पोलिसांना 26 मेसेज पाठवणारा संशयित विरारमधून ताब्यात
अशी वाढली रूग्णांची संख्या
गेल्या दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यात सर्वच आजारांचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यू, हिवताप, गॅस्ट्रो, कावीळ आदी रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. 17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 350 होती. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत 52 ने वाढ झाली आहे. आता रुग्णांची संख्या 402 इतकी झाली आहे. स्वाईन फ्लूनं मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पाचने वाढ झाली. वाढती रूग्णाची संख्या पाहता आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
पालिका क्षेत्रातली आकडेवारी
दरम्यान ठाणे महापालिका हद्दीत गेल्या तीन दिवसांत 39 रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णांची संख्या 291 झाली आहे. यात 3 जणांचा मृत्यू झाल्यानं हा आकडा 8 वर पोहोचला आहे. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीत 6 रुग्णांसह रुग्णांची संख्या 56 वर पोहोचली. तर दोन मृत्यूंसह मृतांचा आकडा 5 वर पोहोचला. नवी मुंबईत 33, मीरा-भाईंदर 6, ठाणे ग्रामीण 4, बदलापूर 8 आणि अंबरनाथमधील एक रुग्ण आहे.
अधिक वाचा- ढगफुटीचे तांडव; अतिवृष्टीत 33 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता, जाणून घ्या देशातल्या पावसाची सद्यस्थिती
एवढ्या रूग्णांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत 402 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची नोंद आहे. त्यापैकी 170 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित 218 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. जिल्हा आरोग्य विभागानं याबाबतची माहिती दिली आहे.
भिवंडी आणि उल्हासनगरमध्ये रुग्ण नाहीत
ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा फैलाव सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपरिषदांपैकी उल्हासनगर आणि भिवंडी महापालिकेत आतापर्यंत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. ही खूप दिलासादायक बाब असल्याचं मानलं जात आहे.
ठाणे, केडीएमसी, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद आणि ठाणे ग्रामीण भागातही तो वेगानं पसार होत आहे. अशा परिस्थितीत मास्क वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. काळजी घेऊन नियमांचं पालन करण्याची सूचनाही आरोग्य विभागानं दिली आहे.