रायगड: Tamhini Ghat Terrible Accident: एका भीषण अपघाताची (Terrible Accident) बातमी समोर येतेय. शनिवारी संध्याकाळी ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) मोठा अपघात झाला आहे. या अपघातात स्विफ्ट डिझायर कार (Swift Dzire car) दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा रायगड जिल्हयाच्या हद्दीजवळ असलेल्या ताम्हिणी घाटात हा अपघात झाला. अपघातातले सर्व तरुण वाशिम जिल्ह्यातले होते. विदर्भातून पर्यटनासाठी कोकणात आले असता त्यांच्यावर काळानं घाला घातला आहे.
अधिक वाचा- मुंबई : रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
कसा घडला अपघात
कोकण-पुणेला जोडणाऱ्या रस्त्यावरच्या ताम्हिणी घाटात स्विफ्ट डिझायर कारचा हा अपघात झाला. ही कार सुमारे 200 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
विदर्भातल्या तीन तरूणांचा मृत्यू
या कारमध्ये एकूण 6 जण होते. कारमधील सहा ही जण वाशिम आणि अकोला येथील होते. हे सर्व जण कोकणात पर्यटनासाठी आले होते. वाशिमहून हे सर्व जण तळ कोकणातल्या देवगडाला फिरायला जात होते. यावेळी ही दुर्देवी घटना घडली आहे. ताम्हिणी घाटात त्यांची कार आली असता एका वळणावर कार कठड्यावरून सुमारे 200 फूट खाली दरीत कोसळली. यावेळी कार दरीच्या मधोमध अडकली होती.
या अपघाताची माहिती रायगड पोलीस, माणगाव पोलीस यांच्यासह आपत्कालीन व्यवस्थापन पथक तात्काळघटनास्थळी दाखल झालं. यावेळी कारमध्ये असलेल्या 6 जणांपैकी जखमी तिघांना शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढलं. तर कारमधल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. मृत आणि जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ भिंगे, कृष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर रोहन गाडे, प्रवीण सरकटे, रोशन चव्हाण जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व वाशिम जिल्ह्यातील आहेत. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहे.