मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये (Chief Ministers )स्थान मिळाले आहे. मूड ऑफ द नेशन अंतर्गत एका एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात हे परिणाम समोर आले आहेत. देशाचा मूड जाणून घेण्यासाठी वर्षातून दोनदा अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाते. मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारे हे निकाल निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कामाच्या आधारे ठरलेल्या देशातील पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. (Uddhav Thackeray did it, Maharashtra is among the top 5 Chief Ministers in India)
सर्वेक्षणाच्या निकालानुसार, कामगिरीच्या आधारे देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. स्टॅलिन, चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पाचव्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आहेत. ओडिशामध्ये बिजू जनता दल, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूमध्ये द्रमुक, महाराष्ट्रात तीनही पक्षांची महाविकास आघाडी सरकार आणि केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरल्याचा आरोप भाजप करत आहे. या पाहणीत ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता आणि त्यांचे काम लोकांना आवडले आहे, ते पाहता भाजपला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. कारण महापालिका निवडणुकीत भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेना या सर्वेक्षणाच्या निकालासाठी जोरदार प्रचार करणार आहे.
सर्वेक्षणानुसार, भाजप टॉप-9 मध्ये सातव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सातव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा, आठव्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि नवव्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत.
गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ४०% पेक्षा कमी रेटिंग मिळाले आहे. सर्वेक्षणात लोकप्रियतेच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कामाच्या बाबतीत पहिल्या नऊ मुख्यमंत्र्यांच्या यादीतून बाहेर आहेत, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. लोकप्रियता आणि कामगिरी या दोन्ही यादीत उद्धव ठाकरे पहिल्या पाचमध्ये आहेत.