मुख्यमंत्री ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात मर्सिडीज कार घुसली! कार चालकाला अटक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक अज्ञात कार घुसल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ संबंधित कार ताफ्यातून बाजूला घेत कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं होतं.

Unidentified Mercedes car enters Chief Minister Thackeray's convoy! Car driver arrested
मुख्यमंत्री ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात मर्सिडीज कार घुसली!  
थोडं पण कामाचं
  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक अज्ञात कार घुसल्याची माहिती समोर आली आहे.
  • मुंबईतल्या साकिनाका परिसरात महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
  • या बैठकीनंतर निघाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक अज्ञात मर्सिडीज कार अचानक घुसली.

CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात एक अज्ञात कार घुसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या साकिनाका परिसरात महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर निघाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक अज्ञात मर्सिडीज कार अचानक घुसली. त्यानंतर सुरक्षा ताफ्यात एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ संबंधित कार ताफ्यातून बाजूला घेत कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं होतं.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित कार चालक एक व्यापारी असल्याचं समोर आले आहे. तो मलबार हिलच्या दिशेनं जात होता. कानात इअरफोन्स घातलेले असल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा जातोय याची कल्पना आली नाही आणि लेन बदलून तो चुकून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आला होता, अशी माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. दरम्यान, संबंधित कार चालक व्यापाऱ्यावर वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि सुरक्षेत अडथळा आणल्याबद्दलच्या अधिकृत कलमाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर गुन्हा जामीनपात्र असल्याने कार चालकाची तात्काळ जामीनावर सुटका देखील झाली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणाबाबत कडक सूचना

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिला सुरक्षा तसंच महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिला विषयक गुन्ह्यांचा आढावा घेतला. 'माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही. राज्यातील महिला सुरक्षित राहिल्याच पाहिजेत. यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी गृह विभागाला पूर्ण पाठबळ देण्यात येईल. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं.

महाराष्ट्रात इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये असलेला सहभाग पाहता मुख्यमंत्र्यांनी याबद्दलही पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी