उस्मानाबाद : एरवी लाईमलाईटपासून कायम दूर असलेले आरोग्य खाते कोरोना साथीच्या काळापासून फोकसमध्ये आले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे तर कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी सावंतांचा हाफकीनच्या औषधांचा व्हिडिओ चांगला व्हायरल होता. आता याच आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात केंद्रीय आरोग्यराज्य मंत्री भारती पवार यांनी उस्मानाबाद रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात फिरत असताना पवार यांनी आपला मोर्चा औषध विभागाच्या दिशेने वळवला. त्यावेळी रुग्णाना सरास औषधे उपलब्ध नाही. ती बाहेरून आणा असा सल्ला दिला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. (Union Health Minister rushed to Osmanabad District Hospital..)
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार कमी पैशात होत असल्याने जिल्ह्यातील गरजू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर डॉक्टर संबंधीत रुग्णांना काही औषधी लिहून देतात. मात्र दहा औषधी पैकी दोन ते तिनच औषधी रुग्णालयात उपलब्ध असते. त्यामूळे उर्वरीत औषधी बाहेरून किंवा खाजगी औषध केंद्रातून घेण्याचा सल्ला रुग्णांना दिला जातो. यामूळे रुग्णांचे आर्थिक नुकसान होतांना दिसून येत आहे.
अधिक वाचा : Narayan Rane अलिबाग न्यायालयात दाखल, सुनावणीदरम्यान कोर्टात नेमकं काय झालं?
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याच जिल्ह्यातील रुग्णालयात गेल्या काही महिन्यापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून त्यांना आर्थिक झळ बसत आहे. हिवाळ्याच्या वातावरणामुळे शहरासह ग्रामीण भागात साथरोगांचे रुग्ण वाढत आहेत. यात मलेरिया, डेंग्यू, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण आहे. रुग्णालयातील रुग्णांना डॉक्टर प्रकृती सुधारण्यासाठी औषधे देतात, मात्र रुग्णालयातील औषध वाटप विभागात औषधांचा साठा बऱ्याच प्रमाणात संपला असल्याने गरीब रुग्णांना स्वत: औषधे खरेदी करावी लागत आहेत.