Vaishnavi a girl defeated boy in wrestling in Jalana district of Maharashtra : जालना : खेळांमध्ये मुली विरुद्ध मुली आणि मुलगे विरुद्ध मुलगे अशी पद्धत आहे. पण दंगल या हिंदी सिनेमात मुलींना कुस्तीपटू करण्याचे स्वप्न बघत असलेला महावीर सिंह फोगाट (अभिनेता आमिर खान) त्याच्या मुली गीता आणि बबिता यांना मुलांविरुद्ध आखाड्यात उतरवतो, असे दाखविले आहे. काहीसा असाच प्रकार महाराष्ट्रात जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथे घडला.
जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथे रंगलेल्या कुस्तीच्या आखाड्यात वैष्णवी साळुंके नावाच्या तेरा वर्षांच्या कुस्तीपटू मुलीने मुलांना आव्हान दिले. यानंतर वैष्णवीने निरखेडा गावातील एका कुस्तीपटू मुलाला आखाड्यात हरविले.
मुलगी विरुद्ध मुलगा अशा कुस्तीत विजेत्या मल्लाला (कुस्तीपटू) एक हजार रुपयांचे बक्षिस जाहीर झाले. कुस्ती सुरू झाली. वैष्णवीने प्रतिस्पर्ध्याला झुलवत बराच वेळ काढला. मुलगी दमेल आणि हरेल असे वाटत होते प्रत्यक्षात उलट झाले. वैष्णवीने अचानक आक्रमक पवित्रा घेत मुलाला चीतपट केले. आखाडा गाजवत वैष्णवीने एक हजार रुपयांचे बक्षिस जिंकले. वैष्णवीची आखाड्यातील कामगिरी पाहून अनेकांनी आयत्यावेळी वैष्णवीला रोख रकमेची बक्षिसं दिली. आयोजकांनी कुस्तीपटू वैष्णवीचा सत्कार केला.
कुस्तीमुळे चर्चेत असलेली वैष्णवी तेरा वर्षांची आहे आणि आठवीत शिकते. वैष्णवी रामकिसन साळुंके असे या मुलीचे पूर्ण नाव आहे. ती मंठा तालुक्यातील वरुड येथील रहिवासी आहे आणि वैद्य वडगाव येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात शिकत आहे. वर्षभरापासून वैष्णवी वेगवेगळ्या कुस्तीच्या आखाड्यांमध्ये नशीब आजमावित आहे. कुस्तीमध्ये वैष्णवीने आतापर्यंत २१ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेची बक्षिसं जिंकली आहेत. वडिलांसोबत दुचाकीवरून वेगवेगळ्या कुस्तीच्या आखाड्यांमध्ये जाणारी वैष्णवी चर्चेचा विषय झाली आहे.
दररोज योगासने करून स्वतःचे शरीर लवचिक ठेवणारी वैष्णवी कुस्तीमध्ये अनेकांना चकीत करत असल्याचे चित्र आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जालना जिल्ह्यातील मौजपुरीत कुस्तीचे आयोजन केले जाते. किमान १०० रुपयांपासून ११ हजार रुपयांपर्यंतची बक्षिसं येथे असतात. यंदा ७० कुस्तीपटू मौजपुरीतील कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत वैष्णवीने उल्लेखनीय कामगिरी केली.