'वायू' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका

गावगाडा
Updated Jun 12, 2019 | 08:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vayu Cyclone Updates: 'वायू' चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकणारे वारे आता पुढे सरकले आहेत. चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी आता नवी समस्या निर्माण झालीय.

Vayu cyclone monsoon delayed updates
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: केरळात मान्सून सक्रिय झाला असून लवकरच भारतातील उतर राज्यांत मान्सूनचं आगमन होणार होतं. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'वायू' चक्रीवादळाचा फटका आता महाराष्ट्राला बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वायू चक्रीवादळ हे कोकण किनारपट्टीवर धडकणार होतं मात्र आता हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेला सरकलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला चक्रीवादळाचा फटका बसणार नाहीये. पण याच चक्रीवादळामुळे मान्सूनचं महाराष्ट्र्रातील आगमन आता उशीरा होणार आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दबाव क्षेत्रामुळे 'वायू' चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. १३ जून रोजी गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर तसेच पोरबंदर, कच्छ या भागांत धडकेल असा अंदाज आहे. पुढील २४ तासांत चक्रीवादळाचा वेग आणखीन वाढेल आणि परिस्थिती आणखीन गंभीररूप निर्माण करेल अशी शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १३० किमी इतका असू शकतो.

मान्सून आठवडाभर लांबणार?

महाराष्ट्रात मान्सून १३ ते १५ जून या कालावधीत दाखल होईल असा अंदाज होता मात्र, आता वायू चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास आणखीन पाच ते सात दिवस लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आधीच पाणी टंचाई आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसासाठी आणखीन आठवडाभर वाट पहावी लागणार असं दिसत आहे.

गुजरातमध्ये हाय अलर्ट

'वायू' चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार आहे. तसेच येत्या काळात वादळाचा वेग आणखीन वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुजरात सरकारने हाय अलर्ट जाहीर केला असून किनारपट्टीवर एनडीआरएफ, नौदलाचे पथक तैनात करण्यात आले आहे. यासोबतच नागरिकांना, मच्छिमारांना सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

वायूचा कोकणात प्रभाव

वायू चक्रीवादळाचा कोकणातील सिंधुदुर्गात काही ठिकाणी परिणाम जाणवला. सिंधुदुर्गातील किनारपट्टीवरील काही भागांत जोरदार लाटा आणि जोरदार वारे वाहत असल्याचं पहायला मिळालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी