संजय राऊतांवर नीलेश राणेची शेलकी टीका 

गावगाडा
Updated Nov 19, 2019 | 16:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

सत्ता संघर्षामुळे भाजप आणि शिवसेना यांच्या दरी वाढली असून भाजपवर दररोज पत्रकार परिषद  घेऊन टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

vidhansabha election 2019 sanjay raut nilesh rane shiv sena bjp news in marathi
संजय राऊतांवर नीलेश राणेची शेलकी टीका  

मुंबई :  सत्ता संघर्षामुळे भाजप आणि शिवसेना यांच्या दरी वाढली असून भाजपवर दररोज पत्रकार परिषद  घेऊन टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाजपचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत हे गल्लीतल्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत, अशी वैयक्तिक टीका केली आहे. 

राज्यात गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या घोळात शिवसेनेने सत्तेचे समान वाटप व्हावे या मुद्द्यावर भाजपशी जवळपास काडीमोड केलेला आहे. त्यामुळे शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या साथीने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे समीकरण जुळवू पाहत आहे. यात शिवसेना आणि भाजप यांच्या नेत्यांची एकमेकांविरूद्ध आग ओकणे सुरू आहे. संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद आणि आपल्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून टीकेची झोड उठवत आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपावर बाण सोडत आहे. 

सामना मध्ये जे काही छापून येते त्यावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. पण काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि शिवसेनेशी विळ्या भोपळ्याचे वैर ठेवणारे नीलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संजय राऊत हे कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत, जो सगळं ठीक असलं तरी सोसायटीतील वॉचमनशी उगाच हुज्जत घालतो, असे ट्वीट केले आहे.

शिवसेनेला एनडीएतून काढण्याच्या एकतर्फी निर्णयाचा 'सामना' वृत्तपत्रातून समाचार घेण्यात आला आहे. काश्मिरात राष्ट्रदोही आणि पाकड्यांचे गोडवे गाणाऱ्या मेहबुबा मुफ्तींशी सत्तेसाठी निकाह लावताना भाजपने एनडीएची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नीलेश राणे यांनी या वक्तव्यालाही उत्तर दिले होते. एनडीएच्या बैठकीचं आमंत्रण शिवसेनेने नाकारले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बैठका हेच करतात आणि वर हुज्जत घालतात. असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

संजय राऊत यांच्यावर नीलेश राणे यांनी यापूर्वीही टीका केली होती. संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल असताना नीलेश राणे यांनी वैयक्तिक टीका केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी