Vipul Ingawale News | सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे (Bhose) गावचे सुपुत्र विपुल इंगवले (Vipul Ingawale) यांना भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना वीरमरण आले आहे. सियाचिनमध्ये अतिशय बर्फाळ भागात ३९ सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदूत बजावत असताना शहीद विपुल इंगवले यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ सैन्य दलाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. विपुल इंगवले यांच्या निधनाने भोसे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान आज सोमवारी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. (Vipul Ingwale from Bhose village in Koregaon of Satara district has been martyred).
दरम्यान रविवारी दुपारच्या सुमारास ही दु:खद घटना घडली. विपुलला रूग्णालयात दाखल केल्यानंतर देखील त्याच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा न झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यामुळे त्यांना पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रचंड थंडीमुळे त्यांची तब्येत आणखी खालावली आणि दुर्दैवाने विपुल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्याची पत्नी आणि एक लहान मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील डी.पी भोसले कॉलेजमध्ये बॉक्सर आणि एनसीसी जवान म्हणून आर.डी परेडमध्ये जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विपुलच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. विपुल यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच देश सेवेचे वेड होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांची एनसीसीमध्ये असताना दिल्लीतील प्रजासक्ताक दिनाच्या परेडमध्ये निवड झाली होती. परिस्थिती बेताची असताना देखील सामान्य कुटुंबातील या जवानाने असामान्य जागी झेप घेतली.
सियाचिनसारख्या अतिशय बर्फाळ भागात देशसेवा बजावताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान फारसे यश आले नाही. दरम्यान विपुल यांच्या निधनाने भोसे गावासह कोरेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.